निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे 'आधारवड' बनले सातपुते गुरुजी!

Satkar_Guruji
Satkar_Guruji

पुणे : एखादा छंद जडला की, तो व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही, असं म्हणतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषदेच्या शाळेत सलग ३८ वर्षे सेवा केलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते गुरूजींच्या माध्यमातून सध्या पुणे जिल्ह्यातील शाळा आणि शालेय विद्यार्धी घेत आहेत.

निवृत्तीनंतर मागील दहा वर्षांपासून सातपुते गुरूजी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पूर्वाश्रमीच्या इयत्ता चौथी, सातवी आणि सध्याच्या इयत्ता पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परिक्षेचे मोफत धडे देत आहेत. केवळ मार्गदर्शनच मोफत नव्हे, तर ते स्वखर्चाने शाळांमध्ये जात आहेत. यामुळे सातपुते गुरूजी हे निवृत्तीनंतर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळा, या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांचे आधारवड बनले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये प्रथम सलग ३२ वर्षे उपशिक्षक आणि त्यानंतरची सहा वर्षं मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षक असताना त्यांचे १०० विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेले आहेत. 

सन २०११ मध्ये ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांनी पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० शाळा आणि अडीच हजार विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संबंधित शाळेत जाऊन मोफत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे हे काम आजही अव्याहतपणे चालू आहे.

सातपुते गुरुजींना त्यांच्या शिक्षकी सेवेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांसह विविध ३० पुरस्कार मिळाले आहेत. ते १९७३ मध्ये शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रमात (डी.एड.) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर १७ सप्टेंबर १९७३ ला जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले. त्यांची पहिली नियुक्ती आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या शाळेत झाली होती, तर २०११ मध्ये ते पिंपळगाव (ता.आंबेगाव) या शाळेतून मुख्याध्यापक पदावर असताना सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतरही सातपुते गुरूजींनी शैक्षणिक कार्यातच स्वत:ला वाहून घेतले आहे. सातत्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ते शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करत आहेत. पूर्वाश्रमीच्या चौथी आणि सध्याच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत १०० शाळांमधील सुमारे दीड हजार आणि पूर्वाश्रमीच्या सातवी आणि सध्याच्या आठवीच्या वर्गातील ५० शाळांमधील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत मोफत मार्गदर्शन केले आहे. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काही शाळा दत्तक घेतल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, नागापूर, वडगाव काशिंबे, काठापूर, जारगडवाडी, शिंगवे, गावडेवाडी आणि जुन्नर तालुक्यातील आनंदवाडी, गुळूंजवाडी आदी काही शाळांमध्ये सातत्याने मार्गदर्शन केले आहे.

गुणवत्ता वाढीतील योगदान  

- माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यासमवेत २९ जानेवारी १९९१ ला नवीन शैक्षणिक धोरण व माहिती तंत्रज्ञान विषयावर चर्चा.

-  राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमवेत चर्चा.

-  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरू करण्यात सहभाग.

- पिंपळगावतर्फे म्हाळुंगे शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्पाची उभारणी. 

-  स्काऊट गाईडचे प्रमुख म्हणून काम.

- सलग २५ वर्षे गृहरक्षक दलात (होमगार्ड) सेवा.

- दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप.

- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन.

- शिरोली (ता.जुन्नर) झेडपी शाळेच्या प्रवेशद्वारासाठी २१ हजार रुपयांची देणगी.

-  पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीस २५ हजार ५५५ रुपयांची देणगी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com