मक्का करार भारताची डोकेदुखी वाढणार

मक्का करार भारताची डोकेदुखी वाढणार
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.७ ः सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा, तुर्कियेपाशी प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षणाचे कारखाने आणि पाकिस्तानकडे प्रचंड लष्कर आणि अण्वस्त्रे असल्यामुळे या तीन देशांनी  केलेल्या संयुक्त संरक्षण करारामुळे  पाकिस्तानच्या लष्कराला मिळणारे थेट बळ आणि पश्चिम आशियातील  देशांबरोबरील  मुत्सद्देगिरीतील अडचणी भारतासाठी डोकेदुखीच्या ठरणार आहेत. 
भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये काही वाद किंवा युद्ध झाल्यास सौदी अरेबिया पूर्वीसारखा तटस्थ राहून मदत करेल, अशी अपेक्षा भारताला बाळगता येणार नाही.  भारताबरोबरच युद्ध झाल्यास पाकिस्तानला तुर्किये आणि सौदी अरेबियाकडून तंत्रज्ञान, रसद आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्रीची मोठी मदत मिळू शकते. काश्मीरच्या मुद्द्यावर नेहमीच पाकिस्तानची उघड पाठराखण करणाऱ्या तुर्कियेचे  अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचा पाकिस्तानात येण्याचा वेग प्रचंड वाढून  पारंपरिक युद्धात भारताचे पाकिस्तानवरील वर्चस्व कमी होण्याचा धोका आहे.

पाकिस्तानचे वजन वाढेल
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्किये या देशांनी आज ‘मक्का संयुक्त संरक्षण करारावर’ स्वाक्षरी केली. या करारामुळे तिन्ही देशांच्या नौदलातील सहकार्यामुळे पाकिस्तानचे नौदल वेगाने वाढविण्यास तुर्किये  मदत करू शकतो.पाकिस्तानने पैशांच्या बदल्यात सौदी अरेबियाला अण्वस्त्रांचे गोपनीय संरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास  जागतिक स्तरावर पाकिस्तानचे वजन वाढेल. यामुळे भारताला लष्करी जरब बसविण्याच्या धोरणात बदल करावा लागेल.

सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तानमधील करारामुळे एकमेकांना पूरक ठरणारी एक  नवी लष्करी ताकद आणि मजबूत आघाडी तयार होणार आहे.  अमेरिकेकडून सुरक्षेची हमी उरली नसल्यामुळे झालेल्या या करारामुळे सौदी अरेबिया आणि तुर्कियेला अण्वस्त्रधारी पाकिस्तानच्या जोरावर  स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा उभारता येईल.

पाकिस्तानच्या लष्कराला उभारी मिळणार?
पाकिस्तान हा मुस्लिम देशांमधील एकमेव अण्वस्त्र सज्ज देश आहे. शिवाय पाकिस्तानपाशी पारंपारिक आणि छुप्या युद्धांचा अनुभव असलेली कायमस्वरूपी फौज आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे ढासळणारी लष्करी यंत्रणा सौदी अरेबिया आणि तुर्कियेच्या मदतीने सावरण्याची पाकिस्तानला संधी मिळणार आहे.

 तुर्कियेकडे अनुभव
‘नाटो’ संघटनेचा  सदस्य असलेल्या  तुर्कियेकडे पाकिस्तानपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य तसेच  ड्रोन, युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या प्रणालींचा समावेश असलेला  वेगाने वाढणारा अतिशय प्रगत संरक्षण उत्पादन उद्योग आहे. तुर्कियेला  सीरिया, लिबिया आणि कॉकेशसमधील थेट युद्धाचा मोठा अनुभव आहे. 

हौथींना अटकाव
सौदी अरेबियाकडे  जगातील अतिशय प्रगत लष्करी शस्त्रे आहेत. पण युद्धांचा अनुभव नसलेला  सौदी अरेबिया देशांच्या सुरक्षेसाठी विदेशी कंपन्या आणि पाकिस्तानी सैन्यावर अवलंबून असतो.  सौदीच्या तेल विहिरींवर हल्ला करणे किंवा लाल समुद्र आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील महत्त्वाचे सागरी व्यापारी मार्ग रोखणे इराण आणि हौथींना कठीण होईल.

कराराचे तोटे
एका देशावर झालेला हल्ला हा सर्वांवर झालेला हल्ला मानले जाणार असल्यामुळे या करारामुळे पाक-सौदी-तुर्किये  प्रसंगी  नाईलाजाने युद्धात ओढले जातील .या करारामुळे पाकिस्तानला भारत आणि अफगाणिस्तानपाठोपाठ इराणपासून पाकिस्तानला त्यांची ९०० किमीची सीमा सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण होणार आहे. ‘नाटो’ बाहेर जाऊन केलेल्या संरक्षण करारामुळे तुर्कियेचे अमेरिका आणि युरोपीय देशांशी खटके उडण्याची शक्यता उद्‍भवून पाश्चात्य देशांकडून शस्त्रास्त्र  पुरवठा बंद होऊ शकतो. 

भारतावर होणारे परिणाम

करारामुळे  पाकिस्तानच्या लष्कराला मिळणारे थेट बळ आणि पश्चिम आशियातील देशांसोबत  मुत्सद्देगिरीतील अडचणी भारतासाठी डोकेदुखीच्या ठरणार आहेत.  भविष्यात भारत-पाकिस्तानमध्ये काही वाद किंवा युद्ध झाल्यास सौदी अरेबिया पूर्वीसारखा तटस्थ राहून मदत करेल, अशी अपेक्षा भारताला बाळगता येणार नाही. भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तानला तुर्किये आणि सौदी अरेबियाकडून तंत्रज्ञान, रसद आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामुग्रीची मोठी मदत मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com