'त्यांच्या मैत्रीला सलाम!'; कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मशिनची सुविधा देतात एकदम फ्री!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

काही रुग्ण दोन तर काही दहा ते बारा दिवसांसाठी या मशीनचा वापर करतात. यासाठी आम्ही 'सेव्ह लाईफ' हा वॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून भोसरी, हडपसर, कोंढवा, वारजे, कर्वेनगर अशा शहरातील वेगवेगळ्या परिसरात गरज असलेल्या रुग्णांना ही मशीन पोहोचविली जाते.

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक रुग्णांना बेडची सुविधा उपलब्ध होत नव्हती. तर काहींना तातडीने ऑक्सिजनची गरज भासत होती. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही ताण येत होता. या परिस्थितीमध्ये प्रशासनाला मदत करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून वारजेतील तरुणांनी एकत्र येऊन काही ऑक्सिजन मशीन विकत घेतल्या. तसेच गंभीर रुग्णांना हे ऑक्सिजन मशीनची सुविधा मोफत देण्यास सुरुवात केली.

कोरोनाच्या भीतीमुळे मोटारींचा खप वाढला!​

याबाबत माहिती देताना अरविंद हाबडे म्हणले, "शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू होत असल्याचे समोर येत होते.  तसेच या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णालयातील खर्च, बेडचा अभाव सारख्या वेगवेगळ्या समस्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना असल्याचे दिसून आले. तेव्हा आपण यासाठी प्रयत्न सुरू करायला हवा याची जाणीव झाली. यासाठी माझ्या काही मित्रांना एकत्र केलं आणि या समस्येवर उपाय म्हणून ऑक्सिजनच्या मशीन विकत घेण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत पैसे जमा केले आणि दोन ऑक्सिजनच्या मशीन घेतल्या. रुग्णालयात बेड मिळेपर्यंत घरीच क्वॉरंटाईन झालेले तसेच रुग्णालयातून घरी आल्यावर गरज पडल्यास हे मशीन रुग्णांना देतो.

कोरोना रुग्णांना दिलासा ! पुण्यातील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 56 टक्के बेड उपलब्ध​

काही रुग्ण दोन तर काही दहा ते बारा दिवसांसाठी या मशीनचा वापर करतात. यासाठी आम्ही 'सेव्ह लाईफ' हा वॉट्सऍप ग्रुप तयार केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून भोसरी, हडपसर, कोंढवा, वारजे, कर्वेनगर अशा शहरातील वेगवेगळ्या परिसरात गरज असलेल्या रुग्णांना ही मशीन पोहोचविली जाते. आमच्या या मोहिमेला आता एक महिना पूर्ण झाला असून आमच्याकडे सध्या पाच मशीन आहेत. तसेच या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 25 रुग्णांना ऑक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या आणखीन तीन मशीन विकत घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे."

या अनोख्या उपक्रमात हाबडे यांच्या बरोबर दिनेश गोळे, विश्राम ढोले, सुधीर मोरे, नंदलाल नित, संतोष घोसाळे, आनंद सावंत, अमीर शेख, शंकर बोडके, अशोक खत्री आणि दिनेश गोळे यांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save Life group is providing free oxygen machines to critically ill patients