Global Family Day 2020 : मुलगी भारतीय, मुलगा जपानी अन् खुललाय सुखी संसार...

Savi kane tells story of her marriage on global family day 2020
Savi kane tells story of her marriage on global family day 2020

अगं सवी, कशी आहेस तू? जपानी नवरा कसा मिळाला तुला? अगं तुझी मुले कशी दिसतात? जपानी की भारतीय? एक ना दोन अनेक प्रश्न..... मलाही उत्तरे द्यायला छान वाटते... काय गुपित आहे माझ्या सुखी संसाराचे?
माझे कुटुंब आहे ग्लोबल कुटुंब... तो जपानी अन्‌ मी भारतीय म्हणून नव्हे, तर आमचा दृष्टिकोन तसा झाला आहे... आमचा देश, संस्कृती, भाषा सगळेच वेगळे...खूप आव्हाने समोर होती. त्यामुळेच मोठे प्रॉब्लेम छोटे करून त्यांना सामोरे जाण्याची सवय जडली. टिपिकल कुटुंबात अशी आव्हाने कमी, त्यामुळे छोटे प्रश्‍न मोठे होतात, नवरा-बायको भांडण्यात अडकून पडतात अन्‌ दुरावा निर्माण होतो. आमच्यातील भिन्नता जाणून घेण्याकडे आमचा कल होता व त्यातूनच उदार दृष्टिकोन बनत गेला. भांडणंही झाली, पण आमची भांडणे निराळी होती. उदाहरणच द्यायचं झालं तर, मी एका नातेवाइकाकडे जपानला पाहुणी म्हणून गेल्यावर हाताने जेवले, त्यावरून वाद... केनने माझी साथ दिली, तो म्हणाला तिच्या देशात हाताने खातात, तसे जेवले म्हणून बिघडले कुठे? नंतर मी चॉपस्टिकने खायला शिकले ही वेगळी गोष्ट, पण केनने मला सांभाळून घेतले, माझ्या संस्कृतीचा आदर केला.

आम्हाला भारत आणि जपान या दोन्ही संस्कृती अनुभवायला मिळतात. आम्ही त्रासदायक रितींकडे डोळेझाक करत हवे ते सण साजरे करतो. दोन्ही देश आम्हाला आमचीच घरे वाटतात. माझी मुले तर दोन्ही देशांच्या पदार्थांवर मस्त ताव मारतात. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर केल्यास कुटुंब एकत्र येतील व जग वैश्‍विक कुटुंब बनेल, यात शंका नाही...
- सवी केन, टोकियो, जपान

दुसरे उदाहरण, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही भारतात आलो, नातेवाइकांना भेटणे सुरू होते. आशीर्वादासाठी मोठ्यांच्या पायाला स्पर्श करणे ही आपली संस्कृती. केनचे म्हणणे, मी तुझ्या आईच्या पायांना स्पर्श करेल, पण इतरांच्या नाही. मी त्याचे विचार समजून घेतले, अन्‌ आमची भांडणे झाली नाहीत... हेच टिपिकल भारतीय किंवा जपानी कुटुंब असते, तर भांडणेच अधिक झाली असती.

एकंदर काय, आव्हाने मोठी असल्याने छोटे प्रॉब्लेम आलेच नाहीत अन्‌ मोठ्या प्रॉब्लेम्सना आम्ही छोटे-छोटे करून नाहीसे केले. आम्ही एकमेकांवर सक्ती करत नाही, आमच्या मुलांवरही नाही. याचा अर्थ माझी मुले बेशिस्त नाहीत. आम्ही दोघेही मुलांना त्यांची मते मांडू देतो, छोटी मुले म्हणून त्यांना कमी लेखत नाही, त्यामुळेच मुले स्वावलंबी बनत आहेत.

आम्हाला दोन्ही संस्कृती अनुभवायला मिळतात. त्रासदायक रितींकडे डोळेझाक करत हवे ते सण आम्ही साजरे करतो. दोन्ही देश आम्हाला आमचीच घरे वाटतात. माझी मुले दोन्ही देशांच्या पदार्थांवर ताव मारतात. मला मांस खाणे आवडत नाही, पण माझ्या मुलांना मी मुभा दिली आहे. केन आणि मी खूप बदललोय, आता तो मला जपानी वाटत नाही अन्‌ मी त्याला भारतीय वाटत नाही. दोन देशातले, दोन संस्कृतीतले अंतर संपले आहे. पुढे जाऊन आमच्या मुलांनी एखादा नवा देश जोडला, तरी आमच्यातली अंतरे न वाढत अंतर्मने अधिक जवळ येतील.

एक आठवण, माझी मैत्रीण सल्ला घायला आली. जपानी मुलाबरोबर लग्न केलेल्या भारतीय मुलीचा अनुभव तिला विचारायला होता. मी तिला एकच म्हणाले, "नवरा कोणत्याही देशाचा असो, नवरा - बायकोत भांडणे होतातच. तुम्ही एकमेकांना किती समजावून घेता यावर सारे अवलंबून असते. एकंदर काय, तुमचा ग्लोबल दृष्टिकोनच तुम्हाला तारून नेतो.'' तिने केले जपानी मुलाबरोबर लग्न, छान चालू आहे तिचा संसार. आजकाल अनेक कुटुंबे वेगवेगळ्या देशांत जात आहेत, तिथे स्थायिक होत आहेत. मात्र, आपल्यातले किती असे लोक ग्लोबल बनले आहेत? फार कमी. परदेशाच्या अनेक वाऱ्या करणारा बायकोला दासी बनवण्याचा प्रयत्न करत आहे, घरातल्या नोकर माणसाला वाईट वागणूक देतो/देते आहे. परदेशात जाऊन पैसे कमावणे अन्‌ मुलांना हवे ते देणे ठिक, पण त्यांना क्वालिटी टाइम कोण देणार? मुलांना चांगले संस्कार कोण देणार?

हळूहळू चांगले बदल होतील, आंतरराष्ट्रीय जोडपी वाढतील अन्‌ त्यातूनच ग्लोबल कुटुंबसंस्था पुढे येतील, खऱ्या अर्थाने जग जवळ येईल...


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com