esakal | Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात कोंडी कायम
sakal

बोलून बातमी शोधा

pune traffic

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात कोंडी कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळच्या चौकातील वाहतूक कोंडी फुटण्याची अद्यापही चिन्हे दिसत नसल्याची सद्यःस्थिती आहे. गणेशखिंड रस्त्यावर तात्पुरत्या उपाययोजना केली. त्यानंतरही वाहतूक कोंडी फुटण्याऐवजी वाढतच आहे. विशेषतः कॉसमॉस बॅंकेसमोरून सेनापती बापट रस्त्याकडे वळण्यासाठीच्या ‘यु टर्न’मुळे कोंडीचे शेपूट वाढत आहे.

कोरोनानंतर निर्बंध शिथिल होऊ लागल्याने बहुतांश क्षेत्र आता खुले होऊ लागले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकामध्ये मागील एक आठवड्यांपासून दररोज कोंडीचा प्रश्‍न निर्माण होऊ लागला आहे. पाऊस पडल्यानंतर तर वाहनचालकांना किमान अर्धा ते एक तास कोंडीमध्ये अडकतो. औंध, बाणेर, पाषाण या तिन्ही मार्गांवरील वाहने एकत्र येऊन विद्यापीठासमोरील चौकातून शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता मार्गे पुढे जातात. मागील काही महिन्यांपासून विद्यापीठासमोरील चौकाच्या परिसरात मेट्रो प्रकल्प व बहुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरीकेडस्‌ लावलेत. त्यातच रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने चालते. या सगळ्या कारणांमुळे दररोज या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. ‘सकाळ’ने त्यावर प्रकाश टाकल्यानंतर काही प्रमाणात कामे सुरू झाली. वाहतूक पोलिसांचे जादा मनुष्यबळ देण्याबरोबरच रस्ते दुरुस्ती व पदपथ काढून रस्ता वाढविण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे.

दरम्यान, कॉसमॉस बॅंकेसमोरून सेनापती बापट रस्त्याकडे वळण्यासाठी तयार केलेल्या ‘यु टर्न’जवळ दुभाजक उभे करण्याचा प्रयोग सोमवारपासून करण्यात आला. त्यामुळे विद्यापीठ चौकातून येणारी वाहने उजवीकडे वळताना वाहनांची गती मंदावल्याने वाहनांची रांग विद्यापीठापर्यंत आली. या प्रयोगामुळे वाहतूक सुरळीत राहण्याऐवजी वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. परिणामी वाहतुक सुरळीत करताना पोलिसांची अक्षरशः दमछाक होऊ लागल्याची सद्यःस्थिती आहे.

"मेट्रोकडून सेनापती बापट रस्त्याकडे वळणाऱ्या ठिकाणी बॅरीकेडस्‌ लावले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन सोमवारी वाहतूक कोंडी झाली होती. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणखीनच वाढेल."

- पुरुषोत्तम देवकर, सहायक पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग.

loading image
go to top