डोंगरावरून कोसळलेल्या बस भीषण अपघातातील गंभीर जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Bus Accident Students

आयुका केंद्राची पाहणी करून पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे ४४ विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व चालक असे एकूण ४९ जण बस मधून येत असताना बस दरीत कोसळली.

डोंगरावरून कोसळलेल्या बस भीषण अपघातातील गंभीर जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

मंचर - गिरवली (ता आंबेगाव) गावाजवळ डोंगरावर असलेल्या आयुका केंद्राची पाहणी करून पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे ४४ विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व चालक असे एकूण ४९ जण बस मधून येत असताना बस दरीत कोसळली. झालेल्या भीषण अपघातातील ८ विद्यार्थी व चालक यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संजय कुमार भवारी व डॉ.श्वेता गोराणे यांनी दिली.याव्यतिरिक्त एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविले असून दोन जणांवर मंचरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मंचर उपजिल्हा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर डॉक्टर व परिचारिकांनी सर्व तयारी केली होती. अपघातातील जखमींना मंचरला आणल्याची माहिती समजल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक व नागरिकांची येथे गर्दी झाली होती. १३ ते १५ वयोगटातील जखमी विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांची अवस्था पाहून अनेकांना रडू कोसळले.

जखमींची नावे :- साहिल सुधाकर गुंजाळ, ऋतिका सखाराम लोहकरे, साक्षी मनोहर पारधी, गीतांजली रामलाल शर्मा, सोनल विशाल जाधव, आनंद सुरेश मधे, आदिती दिनेश पाचांगे, शिक्षक महेंद्र आवटे, चालक लीलाधर ज्ञानेश्वर लांडगे (वय ४५ रा. काळेवाडी- घोडेगाव). सुरेश भोर, संतोष भोर, सुरेश निघोट, सुहास बाणखेले, संजय थोरात, राजाराम बाणखेले, अँड. अविनाश रहाणे, सुनील बाणखेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना धीर देत होते. 'दरम्यान नम्रता लाडके (वय १५) या विद्यार्थिनीच्या डोक्यात अंतर्गत रक्तश्राव होण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून तिला पुणे येथील यशवंत चव्हाण हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठविले आहे.' असे डॉ. गोराणे यांनी सांगितले. मुख्याध्यापक सुरेश मुळे, शिक्षिका मनीषा बिनयके हे खासगी रुग्णालयात मंचरला उपचार घेत आहेत. डॉ. कांचन गावडे, डॉ. मनोज गोंदणे, परिचारिका कुंदा गरे, सुनिता धादवड, मेघा पवार आदी पथक जखमींवर उपचार करत आहे.

'मंचर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनसह सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला, पायाला, हाताला जखमा आहेत. उपचाराला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रकृतीत सुधारणा होत आहे.'

- डॉ. संजय कुमार भवारी, मंचर उपजिल्हा रुग्णालय.