वीटभट्टीवरील मुलांसाठी हवी स्कूलबस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पिंपरी - रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी भागातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना स्टोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. मात्र, वीटभट्ट्यांपासून शाळांचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने मुलांना पायपीट करावी लागत आहे. या मुलांसाठी महापालिकेने बसची व्यवस्था करावी, या मागणीसाठी मुलांसह त्यांच्या पालकांनी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर शुक्रवारी ठिय्या मांडला. 

शहराच्या रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी या उपनगरांमध्ये साधारणतः ४० वीटभट्ट्या आहेत. तिथे काम करणारे बहुतांश मजूर सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील आहेत. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून सर्वेक्षण करून शिक्षण दिले जात आहे. मात्र, वीट भट्ट्यांमधील अंतर जास्त असल्याने आणि संबंधित उपनगरांतील निवास भाग विखुरलेला असल्याने एकाच ठिकाणी सर्व मुले मिळणे व त्यांना शिकवणे अवघड आहे. त्यामुळे सर्व ठिकाणच्या मुलांना एकत्र करून महापालिकेच्या पुनावळे येथील दिलीपराव ढवळे शाळा व रावेतमधील बबनराव भोंडवे प्रशालेत नेऊन शिक्षण दिले जात आहे. या शाळांमध्ये अनुक्रमे ८४ आणि ४६ मुलांना शिक्षण दिले जात आहे. सध्या एका संस्थेच्या बसमधून या विद्यार्थ्यांची सोय केली आहे.

मात्र, एक तारखेपासून ती बस सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय शाळांपासून वीटभट्ट्यांचे अंतर जास्त असल्याने पायी शाळेत जाण्यास मुले तयार नसतात. त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांच्या पालकांनी महापालिका शिक्षण विभागाकडे केली.

माझ्या दोन नाती व एक नातू आहे. त्यांना खूप शिकविण्याची आमची इच्छा आहे. त्यांनाही शाळेची आवड आहे. आता ते रावेतच्या शाळेत जातात; पण बस बंद होणार असल्याने त्यांची आबाळ होणार आहे. पालिकेने बसची व्यवस्था करावी.
- श्रीमंत कांबळे, वीटभट्टी मजूर, 

वीटभट्टी मुजरांच्या मुलांना महापालिकेच्या रावेत व पुनावळे शाळेत जाण्यासाठीची व्यवस्था आम्ही करणार आहोत. त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करावी, असा प्रस्ताव शिक्षण समितीकडे दिला आहे. त्यानंतर तो स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.’’ 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

Web Title: School Bus for Brick kiln Child