esakal | पुणे: विद्यार्थ्यांच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात । School
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: विद्यार्थ्यांच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

पुणे: विद्यार्थ्यांच्या स्वागत उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे: शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असला तरीही मनात काहीशी हुरहूर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे चित्र आहे. परंतु शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केल्याने पालकांनाही प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे. आता सोमवारी (ता.४) शाळेची प्रत्यक्ष घंटा वाजण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता राज्य सरकारने पुन्हा शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ काळानंतर शाळा आणि परिसर पुन्हा विद्यार्थ्यांच्या हजेरीने गजबजणार असल्याने शाळांची देखील विद्यार्थ्यांच्या स्वागताचा उत्सव साजरा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

हेही वाचा: पुणे : शेतकरी कुटुंबातल्या मुलाचं आयएएस होण्याचे स्वप्न साकार

राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचना :

 • - विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांची हवी संमती

 • - शाळा दोन सत्रात भराव्यात

 • - एका बाकावर एकच विद्यार्थी अशी हवी बैठक व्यवस्था

 • - मास्क अनिवार्य हवे

 • - वर्गखोल्या, शाळेचा परिसराचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे

पालकांनी हे करावे :

 • - पाल्यासोबत अतिरिक्त मास्क, सॅनिटायझर द्यावे

 • - सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे अशी लक्षणे असल्यास पाल्याला घरीच ठेवावे

 • - स्वतंत्र जेवणाचा डबा, पाणी सोबत द्यावे

 • - दप्तराचे ओझे कमी ठेवावे

 • - शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा

शाळांनी हे करावे:

 • - वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शाळेच्या परिसरात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे

 • - शाळेत ‘हेल्थ क्लिनिक’ सुरू करावे किंवा शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न करावी

 • - वर्गात अतिरिक्त मास्क, प्राथमिक आरोग्य सुविधा असाव्यात.

 • - विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आदर्श पद्धत शिकवावी

 • - वर्गात हवा मोकळी राहिली, अशी व्यवस्था असावी. वातानुकूलित (एसी) यंत्रणा बंद ठेवावी.

शिक्षकांनी हे करावे :

 • - पहिले एक-दोन आठवडे थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय

 • होऊ द्यावी

 • - स्टाफ रूम आणि वर्गात मास्क, अंतर ठेवणे आदींचे पालन करावे

 • - कोरोनाच्या नियमांची उजळणी विद्यार्थ्यांकडून करून घ्यावी

 • - विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवरही लक्ष ठेवावे

 • - घरातील कोणी बाधित असल्यास शाळेत जाणे टाळावे

हेही वाचा: ५३ नवीन चार्टर्ड अकाउंट्सचा खासदार जलील यांच्या हस्ते सत्कार

‘‘शाळेत येणाऱ्या मुलांचा आणि लसीकरणाचा थेट संबंध नाही. त्यामुळे लसीकरणानंतरच मुलांना शाळेत पाठवावे, असा विचार चुकीचा आहे. कोरोनाच्या नियमांचे योग्य पालन केल्यास कोणतीही अडचण येणार नाही. मात्र आता शिक्षकांना, पालकांना अधिक जबाबदारीने काम करावे लागेल.’’ - डॉ. प्रमोद जोग, सदस्य, बालरोग तज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स)

‘‘महापालिकेने अखेर शनिवारी आदेश दिल्याने अखेर शाळा सुरू करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला. पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणीही पालक करत आहेत. मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी जय्यत तयारी केली आहे. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि काहीशी भीती असे दोन्ही असणार आहे. त्यामुळे पहिले आठ ते दहा दिवस मुलांचे समुपदेशन करण्यासाठी लागणार आहे.’’- संजय सोमवंशी, मुख्याध्यापक, सुंदरबाई मराठे विद्यालय

‘‘पुणे जिल्ह्यात जवळपास दोन हजार २००हुन अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा असून सर्व शाळा सोमवारपासून (ता.४) सुरू होतील. त्यादृष्टीने तयारी देखील केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडण्यासाठी प्रयत्नात आहोत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताचा उत्सव केला जाणार आहे.’’- नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

loading image
go to top