Pune : शाळा आता सुरू व्हायलाच हव्यात; ‘टास्क फोर्स’सदस्यांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

शाळा आता सुरू व्हायलाच हव्यात; ‘टास्क फोर्स’सदस्यांचे मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. विद्यार्थ्यांचे एक शैक्षणीक वर्ष आधीच वाया गेले आहे. मुलांच्या लसीकरणाची वाट बघितली तर हे वर्षही वाया जाईल. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असे मत बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.

लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण मोठ्या माणसांच्या तुलनेने कमी असते. तसेच, या आजाराची तीव्रताही कमी असते. सुमारे ७० टक्के मुलांमध्ये कोरोना विषाणूंच्या विरोधी प्रतिपिंडे (अँटिबॉडिज्) निर्माण झाल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या चौथ्या सर्वेक्षणात ६७.६ टक्के जणांमध्ये प्रतिपिंडे निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी करून शाळा पुन्हा सुरू केल्या पाहिजे, असे मत लहान मुलांच्या ‘टास्क फोर्स’चे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी व्यक्त केले.

लहान मुलांचे लसीकरण

राज्यात १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी बरेच महिने लागू शकतात. हे लसीकरण करताना अतिजोखमीच्या मुलांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. त्यामुळे सामान्य मुलांचे लसीकरण सुरू व्हायला वेळ लागणार आहे. मुलांचे एक शैक्षणिक वर्ष आधीच वाया गेले आहे. आता यंदाचे वर्षही वाया जाईल. शाळा बंद असल्याने मुलांचे शिक्षण, मानसिक आरोग्य, भावनिक विकास यावर विपरीत परिणाम होत आहे.

पालकांनी संभ्रम दूर करावा

अनेक पालकांच्या मनात मुलांना शाळेत पाठवावे की नाही?, याबाबत संभ्रम आहे. शाळेत पाठविल्यावर मुलांना कोरोना तर होणार नाही ना?, अशी भीती काही पालकांना वाटत आहे. मुलांचे लसीकरण होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवायला काही पालक तयार नाहीत.

हेही वाचा: रखडलेली शिक्षक भरती तात्काळ सुरू करण्याबाबत इच्छुक उमेदवारांचे बेमूदत उपोषण सुरू

मुले शिक्षणात मागे

मुलांच्या शिक्षणाच्या जोडीलाच सामाजिकीकरण, भावनिक विकास या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. २०२० मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात तीन महिने शाळेत न गेलेली मुले शाळेत गेलेल्या मुलांपेक्षा सहा महिन्यांनी शिक्षणात मागे पडली, असे निदर्शनास आले. घरी राहिल्यामुळे मुलांना मोबाईल व इंटरनेटचे व्यसन जडले आहे. यातून मुलांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान पालक व शिक्षकांसमोर आहे.

दक्षतेसाठी शाळा सज्ज

एखाद्या मुलाची किंवा शिक्षकाला कोरोना झाल्यास त्यांचे विलगीकरण करणे आणि संपर्कात आलेल्या इतरांवर लक्ष ठेवून गरजेनुसार उपचार करणे याविषयीची सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यानुसार शाळा दक्षता घेतीलच. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊन मुलांना घरात ठेवू नये. ती घरीच राहिल्यास मुलांचे शिक्षण, मानसिक आरोग्य, भावनिक विकास याची अपरिमित हानी होईल याची पालकांनी जाणीव ठेवावी. लसीकरण झाले नसले तरी मुलांना शाळेत पाठवायला पालकांनी घाबरू नये.

तुम्हाला काय वाटते...

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले. आता लसीकरणाची वाट बघितली तर हे वर्षही वाया जाईल. त्यामुळे आता शाळा सुरू झाल्या पाहिजेत का?, याविषयी नावासह आपली प्रतिक्रिया खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवा...

८४८४९७३६०२

loading image
go to top