पुणे : उमेदवारांच्या गोपनीय माहितीची सुरक्षितता ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवारांच्या गोपनीय माहितीची सुरक्षितता ऐरणीवर

पुणे : उमेदवारांच्या गोपनीय माहितीची सुरक्षितता ऐरणीवर

पुणे : राज्यातील सरळसेवा भरती प्रक्रिया (State Direct Service Recruitment Process)आता वेगवेगळ्या कारणाने वादात सापडत आहे. या सर्वच परीक्षांचे कंत्राट घेणाऱ्या खासगी कंपन्यांकडे (private company)उमेदवारांच्या वैयक्तीक माहितीपासून ते शैक्षणिक कागपत्रांपर्यंतचा विदा (डेटा) आहे. वादग्रस्त ठरत चाललेल्या या कंपन्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे उमेदवारांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बाजारात प्रचंड मूल्य असलेल्या या माहितीचा कंपन्यांकडून गैरवापर होण्याची भिती आता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक आरोग्यसेवेपासून ते शिक्षक भरतीपर्यंत अनेक सरळसेवांची लेखी परीक्षा घेण्याचे कंत्राट हे खासगी कंपन्यांकडे आहे. पुणे सायबर पोलिसांच्या चौकशीमध्ये भरती प्रक्रियेतील नवनवे घोटाळे रोज उघड होत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण असून, कंपन्यांच्या विश्वासार्हतेबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.

इंदापूरचा राजेश जाधव (नाव बदललेले) म्हणतो,‘‘मागील वर्षभरातील सर्वच भरती प्रक्रियांसाठी मी अर्ज केला आहे. प्रत्येक भरतीसाठी कंपनी वेगवेगळी असून, मोबाईल क्रमांकापासून ते विविध कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड केले आहे. ही सर्व माहिती या बेजबाबदार कंपन्यांकडून विकण्याची अथवा गैरवापर करण्याची शक्यता आहे.’’ भरती प्रक्रियांतील वाढते घोटाळे बघता, बहुतेक खासगी कंपन्या वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचे व्यवस्थापन आणि उपयोगासंदर्भात कोणतीच माहिती उमेदवारांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या गैरवापराची भीती वाटत आहे.

खासगी कंपन्यांकडील माहिती

 • उमेदवाराचा संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल

 • आधारकार्ड क्रमांक

 • छायाचित्र, स्वाक्षरीचे छायाचित्र

 • शैक्षणिक, जातीचे आणि आर्थिक उत्पन्नाच्या दाखल्यांची सॉफ्ट कॉपी

 • शैक्षणिक, व्यावसायिक कामाचा तपशील

माहितीचे काय होऊ शकते?

 • आधार आणि मोबाईल क्रमांकाद्वारे आर्थिक व्यवहारांवर पाळत ठेवली जाऊ शकते

 • खासगी माहिती जाहिरात किंवा अन्य उपयोगासाठी आणली जाऊ शकते

 • भविष्यात आधार क्रमांक, पत्ता, फोटो आणि मोबाईल क्रमांकाद्वारे डिजिटल व्यवहारांची नोंद घेतली जाईल. या आधारे मिळालेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो

 • चुकीचे अथवा वादग्रस्त काम करणाऱ्यांना ही माहिती विकली जाऊ शकते

महत्त्वाच्या भरतीमधील उमेदवार

 • आरोग्य भरती (गट क व ड) २०२१ ः ८ लाख ६६ हजार

 • म्हाडा २०२१ ः एक लाख ७ हजारांपेक्षा अधिक

 • टीईटी २०२१ ः दोन लाख ५४ हजार

कंपन्यांकडे असलेली माहिती जरी प्राथमिक स्वरूपाची असली तरी तिचा सहसबंध जोडून त्यात वाढ होऊ शकते. अशा वेळी तिचे महत्त्व अधिक वाढते. कंपन्यांनी दुसऱ्या किंवा गैरकामासाठी तिचा वापर करणे अनैतिक आहे. माहितीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपन्यांकडील ही माहिती पूर्णतः डिलीट करणे जास्त सुरक्षित राहील. कारण प्रत्येकाला त्याच्या माहितीच्या सुरक्षिततेचा अधिकार आहे.

- साहिल देव, विदा विश्लेषण तज्ज्ञ

टॅग्स :Pune NewsSecurity Policy