
सुरक्षा विभागाचा फतवा, महापालिकेत पत्रकार परिषदांना बंदी
पुणे : शहरातील प्रश्न, प्रशासकीय धोरण यासह राजकीय घडामोडींवर पुणे महापालिकेत कायम पत्रकार परिषद होत आलेल्या आहेत. मात्र, महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर सुरक्षा विभागाने महापालिकेत केवळ पदाधिकाऱ्यांनाच पत्रकार परिषद घेता येतील असे सांगून बंदी घातली. त्यावर चौकशी केल्यानंतर केवळ तोंडी फतवा काढल्याचे हे समोर आले. दरम्यान, प्रशासनाच्या या आगाऊपणामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिलगिरी व्यक्त करण्याची नामुष्की आली.
पुणे महापालिकेत आज (ता. ८) आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद पत्रकार कक्षात होणार होती. त्यापूर्वी त्यावर सुरक्षा रक्षकांनी कक्षात येऊन आक्षेप घेत पत्रकार परिषद घेता येणार नाही असा आदेश असल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी हे आदेश दिल्याचे समोर आले. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता,महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेता येणार नाही असे आदेश दिले असल्याचे सांगितले. त्याबाबत लेखी आदेश आहेत का? असे विचारले असता तोंडी आदेश दिल्याचे जगताप यांनी सांगितले. पत्रकारांनी जास्तीचे प्रश्न विचारण्यास सुरवात केल्याने जगताप यांनी तुम्ही माझ्याशी वाद घालू नका आयुक्तांकडे चौकशी करा असे सांगत जबाबदारी झटकली.
पुण्यातील नागरिक, संघटना, राजकीय पक्ष त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पत्रकार कक्षात येतात तेथील पत्रकार परिषद घेण्यावर सुरक्षा विभागाने बंदी घातली असल्याचे पत्रकारांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी आयुक्तांनी असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना समज दिली जाईल असे सांगितले.
सुरक्षा यंत्रणेला सहकार्य
महापालिकेत गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. नागरिकांना पास घेतल्यानंतरच प्रवेश मिळतो. त्यास नागरिकांकडून सहकार्य केले जात आहे. पण सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना त्यांचे गाऱ्हाणेही मांडू दिले जात नसल्याचे समोर आले.
Web Title: Security Department Ban Press Conferences Corporation Office Bearers Hold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..