बारामतीतील 52 जणांचा कोरोना रिपोर्ट पहा काय आलाय... 

संतोष आटोळे 
Thursday, 7 May 2020

एकूण 52 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठीचे नमुने पाठविण्यात आले होते.

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्‍यातील कटफळ येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व इतर संशयित, अशा एकूण 52 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठीचे नमुने पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. त्यामुळे बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे. 

कटफळ गावातून मुंबई येथे रविवारी (ता. 3) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या 79 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा सोमवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व इतर लक्षणे जाणवणाऱ्या ग्रामीण भागातील 44 व बारामती शहरात उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमधील 8 जण, अशा एकूण 52 लोकांचे नमुने मंगळवारी व बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह बारामतीकरांनी सुटकेचा श्‍वास घेतला आहे. 

ग्रामीण भागाला दिलासा 
कटफळ प्रकरणापासून तालुक्‍याचा ग्रामीण प्रचंड भीती पसरली होती. मात्र, आता अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आले असले, तरी सुरू असलेले सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिर्सुफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See the corona report of 52 people from Baramati