esakal | पहा, पुणे जिल्ह्यात पाऊस कशी उडवत आहे धांदल... 
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान केले.

पहा, पुणे जिल्ह्यात पाऊस कशी उडवत आहे धांदल... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने मोठे नुकसान केले. काही ठिकाणी गाराही कोसळल्या. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला. विशेषतः द्राक्ष, आंबा, बाजरी, टोमॅटो यांच्या उत्पादकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, या पावसामुळे धूळवाफ झाल्याने भात उत्पादक शेतकरी समाधानी झाला आहे. भाताच्या पेरणीपूर्वी हा पाऊस गरजेचा होता. 

जुन्नर तालुका : नारायणगाव परिसरात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागात तुरळक गारा पडल्या. या अवेळी पावसाचा फटका आंबा, टोमॅटो व बाजरी या पिकांना बसला आहे. सुमारे अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साठले होते. पिंपळवंडी येथे पावसाचा जोर जास्त नव्हता. 

आंबेगाव तालुका : कळंब, लौकी, चांडोली बुद्रूक, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास येथे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. घोडेगाव परिसरातील 10 गावांत वादळी पावसाने आंबा, बाजरी व कांदा पिकाचे नुकसान झाले. 

खेड तालुका : चाकण व परिसरातील गावांमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. तुरळक गाराही पडल्या. रस्त्यावर व शेतात या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. वारेही जोराचे होते. त्यामुळे काही ठिकाणी झाडेही पडली. शेतकऱ्यांच्या साठवण केलेल्या कांद्याचे नुकसान झाले. आळंदी परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. दावडी परिसरात सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला. चाकण एमआयडीसी व वासुली परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. कुरुळी परिसराला पावसाने झोडपले. राजगुरुनगरमध्ये पावसाने हजेरी लावली. 

मुळशी तालुका : मुठा, लवासा खोरे, उरवडे व पिरंगुट परिसरात दुपारी झालेल्या पावसाने भातखाचरांत व अन्य शेतात पाणी साचले. या पावसामुळे धूळवाफ झाल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. भाताच्या पेरणीपूर्वी गरजेचा असलेला हा पाऊस शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे. हिंजवडी, लवळे परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली. जामगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. 

पुणेकरांनो, हा आलेख सांगतोय, पुढचे दोन आठवडे महत्त्वाचे

भोर तालुका : नसरापूर परिसरात काही प्रमाणात पाऊस झाला. त्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. 

बारामती तालुका : उंडवडी परिसरात पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. मात्र, तालुक्‍यात इतर ठिकाणी पावसाने पाठ फिरवली. 

शिरूर तालुका : कोरेगाव भीमा परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तलेगाव ढमढेरे परिसरात रिमझिम पाऊस झाला. शिरूर शहर परिसरात काही ठिकाणी काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यात ऊस व जनावरांच्या चारा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

पुण्यात अडकलेत कामगार, यूपी, बिहार, बंगालच्या मुख्यमंत्र्यांना कोण समजवणार..  

हवेली तालुका : मांजरी, लोणी काळभोर, उरुळी कांचन व खेड शिवापूर परिसरात पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्‍यामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. 

loading image
go to top