

Suhana Swasthyam 2025
Sakal
सीमा आनंद
स्टोरीटेलर, भारतीय संस्कृती व पुराणतज्ञ
प्रश्न : भारतीय संस्कृतीकडे तुम्ही कसे पाहता? आजच्या काळात ती जपण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर : मला असं वाटतं की, संस्कृती हा असा एखादा आकृतीबंध नाही की, जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तसाच्या तसा हस्तांतरित होईल. संस्कृती परिवर्तनशील असून, आपणच आपल्याविषयी ऐकत व सांगत आलेल्या कथांमधून ती रुजते व वाढत जाते. आजची ‘भारतीय संस्कृती’ ही प्रत्यक्षात हजारो वर्षांच्या कथांचे फलित आहे. वैदिक काळातील विचारांपासून अलीकडच्या प्रादेशिक परंपरा जोपासणाऱ्या प्रत्येक पिढीने या प्रवाहात आपले असे काही तरी नवीन जोडले आहे. आपण संस्कृतीची कोणतीही एक व्याख्या धरून ठेवतो, तेव्हा आपण आपल्या परंपरा व तत्त्वज्ञानातील विविधता, समृद्धी नाकारत असतो. परंपरा आणि ग्रंथांच्या पलीकडे जाऊन भारतीय संस्कृती म्हणजे शतकानुशतके आपण कसे जगलो, शिकलो आणि बदलत गेलो याच्या ‘सामूहिक स्मृती’ आहेत असं मला वाटतं. शतकानुशतके आपण जे करत आलो तेच, म्हणजे, बदल आणि उत्क्रांतीद्वारेच आपण आजही संस्कृती जपण्यास कटिबद्ध असायला हवं. त्यासाठी संस्कृतीचा मूळ गाभा काय आहे, हे समजून घ्यायला हवं. द्वैत-अद्वैताच्या अद्भुत वादातून आपण पुढे येत गेलो. सूक्ष्मविचार, सुसंस्कृतपणा, ज्ञानाचा आदर आणि विविधता हा आपल्या विचारांचा पाया आहे. आपण आपल्या ग्रंथांचे वाचन केवळ मथळ्यांप्रमाणे न करता ते मुळातून, संदर्भासह केले पाहिजे. आपण संस्कृतीचा अंगीकार करतो, तिच्यात सहभागी होतो, वेळप्रसंगी प्रश्न उपस्थित करतो आणि त्याद्वारे तिला नव्याने अर्थ देतो, तेव्हाच ती टिकून राहते.