पवारसाहेब- अजितदादांचे स्वप्न साकार करणारे भगतबापू काळाच्या पडद्याआड 

ramchandra bhagat
ramchandra bhagat

सोमेश्वरनगर (पुणे) : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक गावचे भगत घराणे सन १९७५ पासून सलग ४५ वर्षे सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेत आहेत. राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र ज्ञानदेव भगत यांचा कारखाना कार्यक्षेत्रातील दबदबा हे त्यामागचे रहस्य आहे. मात्र, त्यांचे काल सकाळी वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने कारखान्यातील सत्ताधारी व विरोधक यांच्यातील मतैक्याचा दुवा निखळला आहे. 

खुद्द रामचंद्र भगत हे काकडे गटाकडून सतरा वर्षे, तर पवार गटाकडून पंधरा वर्षे, असे सलग ३२ वर्षे संचालक होते. कारखान्याच्या इतिहासात ही विक्रमी कामगिरी कुणी केलेली नाही. सहकारातील ज्येष्ठत्वामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोन गटात त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. सिद्धेश्वर सोसायटीचे अध्यक्ष विलास भगत यांचे ते वडील होत, तर सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक सुनील भगत व आयुर्वेदाचार्य डॉ. यशवंत भगत हे त्यांचे पुतणे होत. 

भगत हे गावातील सिद्धेश्वर सोसायटीतील कारभार सुधारायचा, या हेतूने सन1965 च्या दरम्यान ऐन विशी- पंचविशीत अपघातानेच सहकारात उतरले. सोसायटी ताब्यात घेऊन सुधारणा केली. यानंतर त्यांची सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक कै. मुगुटराव काकडे व कारखान्याचे अध्यक्ष कै. बाबलाल काकडे या त्यावेळच्या सहकारातील मातब्बरांशी मैत्री जुळली. मुगुटराव काकडे यांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता. काँग्रेसचे कार्यकर्ते असताना त्यांनी कोऱ्हाळे येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिराचे नियोजन करण्यात सिंहाचा वाटा उचलला. 

रामचंद्र भगत यांना सन 1975 मध्ये बाबलाल काकडे यांच्या अध्यक्षतेखालील सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळात संधी मिळाली. तेंव्हापासून काकडे गटाकडून 92 पर्यंत ते संचालक राहिले. या काळात दहा वर्षे ते कारखान्याचे उपाध्यक्ष राहिले. सन 1991-92 मध्ये कारखाना विस्तारीकरणाच्या कामाच्या निमित्ताने आर्थिक अडचणीत आला होता. यादरम्यान वैचारिक मतभेद झाल्याने भगत नाराज झाले होते. त्यावेळी राजकारणात उतरलेले तरुण नेते अजित पवार यांनी हे ओळखून कोऱ्हाळे येथील वाड्यावर जाऊन भगत यांची भेट घेतली. कारखान्याचा विकास करून सभासदांच्या प्रपंचात भर घालू, या मुद्द्यावर अजित पवार यांनी रामचंद्र भगत यांचे मन वळविले. यानंतर अजित पवार यांनी आणखी काही शिलेदार आपलेसे करत सत्तांतराचे स्वप्न साकार केले. शरद पवार यांच्याकडे तालुक्याची सत्ता असतानाही सलग तीस वर्षे काकडे गटाची कारखान्यावर निर्विवाद सत्ता होती. 

या ऐतिहासिक सत्तातरानंतर शरद पवार व अजित पवार यांचे भगत हे विश्वासू सहकारी बनले. सन 1992 पासून सन 2007 पर्यंत सलग पंधरा वर्षे ते संचालक राहिले. 32 वर्षे सेवेनंतरही पवारांनी त्यांचे योगदान ओळखून भगत घराणे आजतागायत कारखान्याच्या सत्तेत ठेवले. सन 2007 पासून रामचंद्र भगत यांचे पुतणे सुनील भगत हे संचालक आहेत. ते तीन वर्षे उपाध्यक्षही होते. त्यामुळे भगत घराणे आणि कारखाना हे अतूट नाते आहे.

भगत हे सन १९९२ ला वैचारिक मतभेदातून काकडे गटापासून दुरावले, मात्र तरीही काकडे परिवाराशी त्यांचे सलोख्याचे संबंध कायम राहिले. तसेच, राष्ट्रवादीतही सहकारातील योगदानामुळे त्यांचा दबदबा कायम राहिला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा भगत यांची मध्यस्थी कामी येत होती. वार्षिक सभेतील वादावादी असो किंवा कारखानाविरोधी आंदोलन असो, भगत यांच्या शब्दाला किंमत देऊन दोन्ही गट माघार घेत. 

भगत हे सहकाराचे कट्टर समर्थक होते आणि कारखाना हा प्रपंच आहे, ही त्यांची शेवटपर्यंत भूमिका होती. ते स्वतः कारखान्याचे अध्यक्ष झाले नसले, तरी कारखान्याचे अध्यक्षपद किंवा जिल्हा परिषद उमेदवारी याबाबत त्यांच्या शब्दाला पक्षश्रेष्ठींकडे किंमत होती. कोऱ्हाळे गावातील सत्ताही सध्या त्यांच्याच गटाच्या ताब्यात आहे. 

Edited By : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com