वाळू माफियांकडून महिला तहसिलदारांवर पाळत, लोकेशन करायचे टॅप

नितीन बारवकर
बुधवार, 8 जुलै 2020

वाळू उपशावर छापे टाकण्यासाठी निघणा-या अधिका-यांवर पाळत ठेवण्यासाठी खास यंत्रणा लावत आता अधिकारी निवासस्थानांची 'रेकी' करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. 

शिरुर, ता. 8 : शिरुर तालुक्यातील वाळूमाफियांचे धाडस वाढत चालले असून, वाळू उपशावर छापे टाकण्यासाठी निघणा-या अधिका-यांवर पाळत ठेवण्यासाठी खास यंत्रणा लावताना आता अधिकारी निवासस्थानांची 'रेकी' करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. शिरुर च्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख या, शिरुर तालुक्यात बोकाळलेल्या अवैध वाळू धंद्याच्या कर्दनकाळ ठरल्या असून, गेल्या काही दिवसांत त्यांनी अवैध वाळू उपसा व बेकायदा वाहतूकीविरोधात धडाकेबाज कारवाई करीत वाळूमाफियांचे कंबरडे मोडल्याने वाळू सम्राट भाई, दादांचे पित्त खवळले आहे. त्यातूनच काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर पाळत ठेवली जात असल्याचा प्रकार पुढे आला होता. 

अवैध वाळू उपशाची माहिती मिळाल्याने पहाटे घटनास्थळी जाण्यासाठी तहसीलदार लैला शेख निघाल्या असता, दोन तरुण घरासमोर प्रवेशद्वाराजवळ घुटमळताना दिसताच त्यांनी आपल्या पतीला बोलावले. तेव्हा संबंधित तरूण त्यांच्याकडील मोटारीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या पतीने त्यातील एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिसका मारुन तो पळून गेला. या झटापटीत त्याचा मोबाईल तेथे पडला. नंतर पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला. त्यात शिरुर, खेड,जुन्नर च्या तहसिलदारांचे 'लोकेशन' टॅप केले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.  त्याबाबत गुन्हा दाखल झाला. मात्र, तरीही वाळूमाफियांचे धंदे आणि मुजोरी कमी झाल्याचे दिसत नाही.

हे वाचा - चिंतेत पडलेल्या अश्विनी कदमांनी केला अजितदादांना फोन

तहसीलदार शेख या काल सायंकाळी उशिरा कार्यालयातून घरी आल्या. शहरातील मध्यवर्ती भागात रेव्हेन्यू काॅलनी या गजबजलेल्या भागात त्यांचे 'इंद्रप्रस्थ' हे निवासस्थान आहे. साडेसात वाजण्याच्या सुमारास त्या सहज म्हणून घरातील पुढच्या बाजूस आल्या  असता त्यांना बाहेरच्या बाजूला कुजबुज चालू असल्याचे जाणवल्यामुळे त्या तातडीने बाहेर आल्या. तेव्हा चारजण त्यांच्या जवळील मोबाईल मधून इंद्रप्रस्थ या शासकीय निवासस्थानाचे व्हिडिओ चित्रीकरण करीत असल्याचे व फोटो काढत असल्याचे दिसल्याने तहसीलदार शेख यांनी त्यांना हटकले तेव्हां ते त्यांच्याकडील मोटारीतून पळून गेले. तहसीलदार शेख यांनी तातडीने बाहेर येऊन पाहिले असता, ती एमएच 46 पी 4246 या क्रमांकाची 'स्वीफ्ट' कार असल्याचे त्यांनी पाहिले.

हे वाचा - जुन्नरकरांनो सावधान, कोरोनाची वाटचाल शतकाकडे

याबाबत शिरुर चे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या कडे तहसीलदार शेख यांनी आज लेखी तक्रार केली. गेले वर्षभर शिरुर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना बेकायदा वाळू व्यवसाय करणारांकडून पाळत ठेवली जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रवासात इतर वाहनातून पाठलाग केल्याचे; तसेच कारेगाव जवळ गाडी आडवी मारण्याचा प्रकार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचा - पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तहसीलदार शेख यांच्या तक्रार अर्जानुसार असे बेकायदा चित्रीकरण करणारांचा शोध घेतला जाईल व त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितले. तहसीलदार शेख यांच्या वरील पाळत व त्यांच्या निवासस्थानी रेकी च्या झालेल्या प्रकाराचा महसूल कर्मचार्यांनी निषेध नोंदवला असून विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एक कर्तबगार महिला अधिकारी कर्तव्यदक्षपणे काम करीत असताना जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला गेल्यास समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिल, असा इशारा देण्यात आला.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sand mafia tap location of tahsildar trying attack in shirur