वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'

Police
Police

वारजे माळवाडी (पुणे) : ते महिन्यांपूर्वीच पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाले. पोलिस ठाण्याचा सर्व आवाका घेत होते. अन योगायोगाने त्यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस होता. पोलिस मित्रांनी वाढदिवसाची वार्ता हद्दीतील सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहचवली. त्या सर्वांनी साहेबांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवस दणक्यात साजरा केला गेला. एका बाजूला नवीन साहेबांचा जनसंपर्क वाढला असला तरी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने हा वाढता जनसंपर्क चांगलाच अंगलट आला आहे. 

शहर पोलिस दलातील पश्चिमेला असलेल्या परिमंडळामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना वाढदिवसाच्या दिवशी जनसंपर्क वाढविणे, थेट-भेटी घेणे अंगलट आले आहे. कारण पोलिस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पोलिस ठाण्यातील गुन्हे निरीक्षक देखील आधीपासूनच कोरोनाग्रस्त असल्याने आता पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकारीच नाहीत. 

त्याचे झाले असे की, या पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचा बुधवारी होता जन्मदिवस. साहेबांनी जुलै महिन्यात या पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळातही वाढदिवस आला. थेट भेट नको याचा विसर अधिकाऱ्यांना पडला अन भेटायला आलेल्या जनतेला ही पडला. 

नवीन साहेब आलेत. त्यांच्याशी आपली मैत्री करण्याची संधी असल्याने राजकारण, समाजकारणापासून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. यावेळी भेटवस्तू, वाढदिवसाचे केकवर केक कापले गेले. अनेकांनी स्वतः हून केक व पेढे भरविले. अनेक कार्यालयात जाऊन हा वाढदिवस साजरा झाला. साहेबांची कोरोनाच्या काळात झालेली मैत्री पुराव्यासह सोशल मीडियावर बहरली. आणि व्हायरल झाली. बुधवारी साहेबांचा दणक्यात वाढदिवस साजरा झाला अन जनसंपर्क देखील वाढला. दोन दिवसांनी या बहरलेल्या मैत्रीत माशी शिंकली, कारण साहेबांचा कोरोना टेस्टचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. या आठवड्यात त्यांना भेटलेल्या नागरीक आणि पोलिसांची यादी तयार झाली. त्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घेण्यासाठी आता पोलिस जनतेचा शोध घेत आहे. केक, पेढे भरविणारे आता गॅसवर आहेत.

लॉकडाउन, अनलॉकच्या काळात पोलिसांनी कायदा व व्यवस्था सांभाळायची आहे. त्यांनीच दणक्यात असा वाढदिवस साजरा झाल्याने यात 'कोण चुकले आणि कोण बरोबर' हे ठरवणे अवघड झाले आहे. येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाच्या निरीक्षकांना महिनाभरापूर्वी कोरोनाने गाठले होते. ते रुजू होणार तोच त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची चाचणी पुन्हा पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे, ते आता पुन्हा उपचार घेत आहेत. 

दरम्यान, नव्याने झालेल्या शेजारील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली असून ते देखील दीनानाथ रुग्णालयात शनिवारपासून उपचार घेत आहेत. त्यामुळे आता पोलिस आयुक्तालयाला दोन्ही पोलिस ठाण्यासाठी तात्पुरती अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. 

या पोलिस विभागातील दोन्ही वरिष्ठ अधिकारी कोविडग्रस्त झाले आहेत. एका सहायक निरीक्षकांना तात्पुरता पदभार दिला आहे. लवकरच या ठिकाणी दुसऱ्या निरीक्षकांना नेमून त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com