ज्येष्ठांना त्यांच्या हक्काच्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा; गिरीश बापट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seniors citizen get benefit from government schemes in their own right Girish Bapat

ज्येष्ठांना त्यांच्या हक्काच्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा; गिरीश बापट

पुणे : केंद्र आणि राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठीच्या अनेक सरकारी योजना कार्यरत आहेत. परंतु या योजनांची प्रभावी अंलबजावणी होत नसल्याने,अनेक ज्येष्ठांना या योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळत नाही.ज्येष्ठांसाठीच्या सरकारी योजनांची केवळ प्रभावी अंमलबजावणी झाली, तरी ज्येष्ठांच्या निम्म्या समस्या संपुष्टात येतील, असे मत खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी (ता.१५) एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. व्यक्ती किंवा समाज आजारी पडल्यानंतर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा त्यांच्या गरजा वेळीच ओळखून त्यावर अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

जनसेवा फाउंडेशन, राज्याचा सामाजिक न्याय विभाग, एल्डर लाइन, हेल्पेज इंडिया,फेस्कॉम, एस्कॉप, एकता योग ट्रस्ट, भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्ययोग परिवार, ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि पुण्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक छळवणूक प्रतिबंध जनजागृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, अंकुश काकडे, रवींद्र धारिया, उल्हास पवार, जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, खजिनदार राजेश शहा, फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे, एस्कॉपचे कार्याध्यक्ष दिलीप पवार, एल्डर लाइनचे समन्वयक स्मितेश शहा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्रालयाचे प्रधान सचिव आर. सुब्रह्मण्यम यांनी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून ज्येष्ठांशी संवाद साधला.

बापट म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नागरिकांनी समाजाकडून काही मागावे, अशी परिस्थिती न उदभवता समाजाने ज्येष्ठाविषयी आदर आणि सन्मान राखत वेळप्रसंगानुसार त्यांना मदत केली पाहिजे. यामुळे समाजात किंवा कुटुंबात आपली अडचण झाली आहे, ही भावना ज्येष्ठांच्या मनात जागी होणार नाही. यासाठी सकस आणि पोषक वातावरण आपण ज्येष्ठांना देऊ शकलो पाहिजे.’’

यावेळी अमिताभ गुप्ता, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त रवींद्र कदम, हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर यांचेही भाषण झाले. डॉ. विनोद शहा यांनी प्रास्ताविक केले. जे.पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राजेश शहा यांनी आभार मानले.

Web Title: Seniors Citizen Get Benefit From Government Schemes In Their Own Right Girish Bapat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top