शेअर निर्देशांकांची वाढ मर्यादित

शेअर निर्देशांकांची वाढ मर्यादित
Published on

‘सेन्सेक्स’ १३० अंशांनी वाढला 
मुंबई, ता. १५ : नफावसुली; तसेच अमेरिका-इराण यांच्यातील वाढलेला तणाव यामुळे आज भारतीय शेअर बाजारांना फार मोठी मजल मारता आली नाही. ‘सेन्सेक्स’ १३०.४९, तर ‘निफ्टी’ २६.४५ अंशांनी वाढला.  आज व्यवहाराला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत ‘सेन्सेक्स’ ७८ हजारांच्या जवळपास फिरत होता. मात्र, शेवटच्या दोन तासात विक्रीचा मारा झाल्याने निर्देशांक ७७,२०० च्या खाली गेला. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७७,१८५.४३ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २४,०७८.५० अंशांवर स्थिरावला. 

आजच्या तेजीमुळे सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. काल शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांच्या सर्व शेअरचे एकूण मूल्य ४७९ लाख कोटी रुपये होते. आज ते ४८२ लाख कोटी रुपये झाले. आज शेअर बाजारात २२०३ शेअरचे भाव वाढले. १८९६ शेअरचे भाव कमी झाले, तर १५८ शेअरचे भाव कालच्याएवढेच राहिले. ‘आयबीएम’च्या शेअरचे भाव २५ टक्क्यांनी पडल्याने आज भारतातही आयटी शेअरने घसरण नोंदवली.  आज मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्र वाढले. सिमेंट निर्देशांक १.८ टक्के वाढला, सरकारी बँकांचा आणि रसायनिक क्षेत्राचा निर्देशांक एक टक्का वाढला, तर धातूनिर्मिती निर्देशांक एक टक्का घसरला. आयटी निर्देशांक पाऊण टक्का घसरला. एफएमसीजी निर्देशांक अर्धा टक्का घसरला. 
अमेरिकेची घटलेली चलनवाढ आणि त्यामुळे फेडरल बँकेने आक्रमक भूमिका न घेणे, याचबरोबर आशियाई शेअर बाजारातील सकारात्मक संकेत त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. केवळ कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे नफावसुली झाली. व्यवसाय चांगला झाल्याने सरकारी बँकांच्या शेअरचे भाव वाढले, तर भारत इंग्लंड व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग आणि उद्योगधंद्यांचे शेअर वाढले. चीनचा ‘जीडीपी’ कमी झाल्यामुळे धातूनिर्मिती शेअर घसरले, असे विनोद नायर यांनी सांगितले.
‘सेन्सेक्स’मध्ये एटर्नल आणि अल्ट्राटेक तीन टक्के वाढले. स्टेट बँक, बजाज फायनान्स, इंडिगो, एशियन पेंट, टेक महिंद्र, एचडीएफसी बँक, सन फार्मा, मारुती, आयसीआयसीआय बँक यांचे भाव वाढले, तर पॉवरग्रीड, लार्सन अँड टूब्रो, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, एअरटेल, टीसीएस यांचे भाव घसरले.

कोट.........
केंद्राने सेमीकंडक्टर मिशन दोन जारी करून मोठा निधी मंजूर केल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि कॅपिटल गुड्स शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
-सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com