esakal | पोलिसांच्या इमारतींसाठी स्वतंत्र जलवाहिनी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पोलिसांच्या इमारतींसाठी स्वतंत्र जलवाहिनी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलिसांसाठी शिवाजीनगर येथे उभारलेल्या बहुमजली टॉवरला पाणी पुरवठ्यासाठी अखेर पोलिस व महापालिका प्रशासन यंत्रणा जागी झाली. काम पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यांनी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली.

पर्सिस्टंट फाउंडेशनच्या वतीने पोलिसांसाठी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाजवळ कोट्यवधी रुपये खर्च करून ‘रायगड’ व ‘शिवनेरी’ हे दोन २२ मजली टॉवर उभे केले आहेत. दोन ते अडीच वर्षात या इमारतींचे काम पूर्ण होऊन जुलै महिन्यात या इमारतींचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. भाग्यवान सोडत काढून पोलिस कर्मचाऱ्यांना घरांचे वाटपही करण्यात आले. त्यास तीन महिने झाले, तरी संबंधीत इमारतींसाठी आवश्‍यक पाणीपुरवठ्याची व्यवस्थाच करण्यात आली नाही. त्यामुळे घरे मिळालेल्या पोलिसांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

पोलिस व महापालिका प्रशासनाकडून या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात होते. त्याबाबत ‘सकाळ’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध करून त्यावर प्रकाश टाकला होता. त्याची पोलिस व महापालिका प्रशासनानने गांभीर्याने दखल घेतली. सोमवारी सकाळपासूनच वरिष्ठ पोलिस अधिकारी व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरातून स्वतंत्र जलवाहिनी नेण्यासाठी जागेची पाहणी केली. त्यानंतर तत्काळ यंत्रसामुग्री आणुन कामही सुरू केले. मंगळवारपर्यंत ४० पाइप टाकण्यात आले होते. आणखी १५ पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, जमीनीमध्ये खडक लागल्याने पाइप टाकण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्‍यता आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांचे या कामावर लक्ष आहे.

सोमवारपासून स्वतंत्र जलवाहिनीच्या कामाला सुरुवात केली. पाइप टाकण्याच्या कामाला खडकाळ जमिनीमुळे अडचण येत आहे. मात्र, काही दिवसांतच जलवाहिनीची, तसेच इमारतीमधील राहिलेली कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर लवकरच पोलिस नव्या घरात राहायला जाऊ शकतील.

- डॉ. जालिंदर सुपेकर,

अतिरिक्त पोलिस आयुक्त, प्रशासन विभाग

रविवारी पाइप आल्यानंतर तत्काळ पाइपलाइन टाकण्यास सुरुवात झाली आहे. फर्ग्युसन महाविद्यालय आणि पोलिस प्रशासनाकडूनही योग्य सहकार्य मिळाले असून, येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्ण होईल.

- अनिरुद्ध पावसकर,

प्रमुख, महापालिका पाणीपुरवठा विभाग

loading image
go to top