औताडेवाडी-हांडेवाडीतील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औताडेवाडी - हांडेवाडीतील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या

औताडेवाडी - हांडेवाडीतील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या

sakal_logo
By
अशोक बालगुडे

उंड्री : मागिल वर्षी पाऊस कमी झाल्याने पाझर तलाव कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, कृती मात्र शुन्य अशी अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. औताडेवाडी-हांडेवाडी ग्रामपंचायतीची ३० हजार लीटर क्षमतेच्या पाण्याची टाकी आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे पाणी समस्या तीव्रतेने जाणवू लागली आहे. महापालिकेचे अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली मात्र, अद्याप कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांना किमान पाणी तरी मिळेल, अशी आशा सामान्य नागरिकांना होती, मात्र, ती फोल ठरली आहे.

माजी सरपंच अशोक न्हावले, माजी उपसरपंच पांडुरंग औताडे, पंढरीनाथ औताडे, राजेंद्र औताडे म्हणाले की, पाऊस भरपूर झाल्यानंतर पाझर तलाव पाण्याने भरत होते, त्यामुळे विहिरी पाण्याने तुडुंब भरत होत्या. त्यामुळे पाणी समस्या कधी जाणवली नाही. मात्र, मागिल वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पाणी समस्या प्रकर्षाने जाणवू लागील आहे. दरम्यान, नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्याकडून दररोज दोन पाण्याचे टँकर येत आहेत.

हेही वाचा: निपाणी शैक्षणिक तालुका : वेळेत अभ्यासक्रम संपविण्याचे आव्हान

औताडेवाडी-हांडेवाडी ग्रामपंचायत महापालिकेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन पाण्याचे टँकर विकत घेऊन नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवित होते. मात्र, गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतीचा कारभार संपुष्टात आला. विहीरीला पाणी कमी पडल्याने सामान्य नागरिकांनाही आता पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाने सामान्यांचा आर्थिक भुर्दुंड टाळण्यासाठी किमान पिण्याचे पाणी तरी पुरवावे, असे पांडुरंग औताडे यांनी सांगितले.

राजेंद्र औताडे म्हणाले की, पाझर तलावात पाणी नाही, विहिरी आटल्या आहेत, त्यामुळे शेतपिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाने किमान पिण्याचे पाणी देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी केल जाईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख पावसकर यांनी सांगितले.

loading image
go to top