PM मोदींच्या सीरम भेटीनंतर आदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीरम इन्स्टिट्यूला भेट दिल्यानंतर कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसभरात देशातील व्हॅक्सिन निर्मिती करणाऱ्या तीन कंपन्यांना भेट दिली. यामध्ये पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीरम इन्स्टिट्यूला भेट दिल्यानंतर कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पूनावाला यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हॅक्सिनबाबत आधीच बऱ्यापैकी माहिती घेतली होती. त्यांनी व्हॅक्सिनच्या वितरण प्रणाली आणि इतर बाबींवर चर्चा केली. सध्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे सर्वांचे लक्ष असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. 

कोरोना लशीच्या वितरणाबद्दल प्रश्न विचारला असता आदर पूनावाला म्हणाले की, कोरोनाच्या लशीचे पहिल्यांदा भारतातच वितरण होईल. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध होतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या सीरम इन्स्टिट्यूट महिन्याला 4 ते 5 कोटी डोस तयार करते. ते प्रमाण 10 कोटी डोसपर्यंत जाईल अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लशीचा वापर करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून दोन आठवड्यात यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 

काय म्हणाले आदर पूनावाला -
लशीच्या उपलब्धतेबाबत आणि किंमतीबाबत मोदींसोबत चर्चा
आपत्कालिन परिस्थितीमध्ये लशीच्या वापराबाबत हालचाली
जूलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध
सध्या महिन्याला 3 ते 4 कोटी डोस तयार होतात याचे प्रमाण 10 कोटी डोसपर्यंत वाढेल
सगळ्यात आधी भारतात विकली जाईल लस
100 कोटी डोस वर्षात निर्माण करण्याची शक्यता
लशीची साठवण आणि पुरवठा करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत
कोविशिल्डची चाचणी तिसऱ्या टप्प्यात असून त्याकडे लक्ष आहे.
एस्ट्राझेनकाच्या चाचणीवर प्रश्न उपस्थित केले जात असले तरी त्यामुळे भारतात अडथळा येणार नाही
लस पूर्णपणे सुरक्षित असून यामुले 60 टक्के रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute CEO adar poonawala press conference after pm modi visit