esakal | गूड न्यूज : सीरमची लस आणखी स्वस्त; आदर पूनावालांनी दिली माहिती

बोलून बातमी शोधा

Good News : सीरमची लस आणखी स्वस्त

देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे उत्पादन करतात.

Good News : सीरमची लस आणखी स्वस्त
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - केंद्र सरकार आणि विविध राज्यांनी लशीची किंमत कमी करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड या लसीची किंमत शंभर रुपयाने कमी करण्याचा निर्णय़ घेतला. यापुढे कोव्हिशिल्ड लस राज्यांना तीनशे रुपयांना देण्यात येईल. मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतल्याचे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आमच्या या निर्णयामुळे राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचणार असून यामुळे वेगाने लसीकरण होऊन अनेकांचे जीव वाचतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

देशात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे उत्पादन करतात. लशीच्या एका मात्रेसाठी सीरमने केंद्र सरकारला दीडशे रुपये (जीएसटीसह), राज्य सरकारला तीनशे रुपये; तर खासगी रुग्णालयांना सहाशे रुपये असा दर जाहीर केला आहे. भारत बायोटेकचे दर राज्य सरकारला सहाशे रुपये आणि खासगी रुग्णालयांना १२०० रुपये आहेत. याच लशी परदेशात पाठवण्यासाठी १५ ते २० डॉलर प्रति मात्रा असे शुल्क कंपन्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्णांची कोरोनावर मात

पुण्यासाठी २५ हजार कोव्हिशिल्ड लस

शहरातील लसीचा साठा पूर्णपणे संपलेला असताना राज्य सरकारकडून बुधवारी रात्री २५ हजार कोव्हिशिल्ड लशींचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी महापालिकेच्या केंद्रांवर लसीकरण होणार आहे. तसेच, शहरात कोव्हिशिल्डचे दीड हजार व कोव्हॅक्सिनचे सुमारे ७ हजार ५०० डोस उपलब्ध होते. त्यामुळे बुधवारी खासगी व पालिकेच्या केंद्रांवर तीन हजार ७८३ नागरिकांचे लसीकरण झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: सरकारलाच लोक मरताना पाहायचेत; दिल्ली उच्च न्यायालय प्रोटोकॉलवर भडकले

सर्वांचे लसीकरण मोफत; राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोव्हिड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.