Serum Institute Fire: आग लागली की लावली; घटनेच्या चौकशीची मागणी

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास सीरमच्या एका इमारतीत ही आग लागली होती.

पुणे : लस निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सीरममध्ये कोरोना प्रतिबंध लस (कोविशिल्ड) तयार करण्यात येत आहे. त्यामुळं आगीच्या दुर्घटनेकडं संशयानेही पाहिले जात आहे. त्यातच पुण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी देखील आगीच्या घटनेविषयी संशय व्यक्त केलाय.

आग लागली की लावली?
याबाबत ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'सीरम  इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याची माहिती मला सोशल मीडियातून मिळाली. पण, इमारतीमध्ये आग लागली की लावली याची चौकशी झाली पाहिजे.' भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी देखील घटनेविषयी संशय व्यक्त केलाय.

मुक्ता टिळक म्हणाल्या, 'कोविशिल्ड विभागाला आग लागलेली नाही. तो विभाग सुरक्षित आहे. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटतोय. कोरोना लस सुरक्षित असली तरी, त्या परिसरात लस बनवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मला घातपाताची शंका वाटतेय.'

हे वाचा - सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

कंत्राटदाराकडील कामगारांचा मृत्यु 
अग्निशामक दलाच्या जवानांनी तिसऱ्या मजल्यावर इलेक्‍ट्रीक व फर्निचरचे काम करणाऱ्या पाच कामगारांची सुखरुप सुटका केली होती. दरम्यान, इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पाच मृतदेह सापडले. मृत्यु झालेल्या व्यक्ती सीरमच्या कर्मचारी होते की कंत्राटदाराकडील कामगार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र मृत व्यक्ती या कंत्राटदाराकडील कामगार असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात काम अग्निशामक दल व पोलिसांकडून सुरू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute fire break reaction prakash ambedkar bjp mla mukta tilak