Serum Institute Fire:सीरमच्या आगीनंतर संभाजी ब्रिगेडचं पत्रक; 5 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

टीम ई सकाळ
Thursday, 21 January 2021

गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात आगीची ही दुसरी दुर्घटना आहे. भंडारा सामान्य रुग्णालयातील आग आणि त्यानंतर पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग या दोन्ही दुर्घटनांमध्ये जिवितहानी झाली आहे. 

पुणे - गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात आगीची ही दुसरी दुर्घटना आहे. भंडारा सामान्य रुग्णालयातील आग आणि त्यानंतर पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग या दोन्ही दुर्घटनांमध्ये जिवितहानी झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची आग आता वादाच्या भोवऱ्यात अडकली असून संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी सीरमच्या आगीबाबत संशय व्यक्त करताना आग लागली की लावली असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान, आता संभाजी ब्रिगेडनंसुद्धा पाच लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. 

सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लावली की लागली हा संशोधन तपासण्याचा विषय आहे. परंतु देशभरातून ज्या मोठ्या संशोधन संस्थेकडे आशेने लोकांचं लक्ष लागलेला आहे अशा 'सिरम इन्स्टिट्यूट' मध्ये अचानक आग लागणे ही धोक्याची घंटा आहे. नक्कीच हा हलगर्जीपणा किंवा संशय निर्माण करणारी घटना आहे. मात्र याकडे पोलिस प्रशासन अथवा इतर यंत्रणांनी गंभीर पणे घेतलेलं दिसत नाही. कारण घडलेल्या घटनेच्या दोन तासांमध्ये प्रत्येकांचे स्टेटमेंट वेगळेवेगळे आलेले आहेत.

पोलीस आयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करतात, एक तासाने  मुख्यमंत्री महाराष्ट्राला या घटनेबद्दल संबोधित करतात. सिरम इन्स्टिट्यूट मधील स्टाफमधील प्रधान नावाचा व्यक्ती कुठलीही जीवित हानी झाली नाही असं सांगतात. तोपर्यंत अचानक 5 वाजता 5 लोक गेल्याची (मृत्यूची) बातमी येते. ही संशय निर्माण करणारी घटना आहे.

हे वाचा - Serum Institute Fire: आग लागली की लावली; घटनेच्या चौकशीची मागणी

सीबीआय चौकशी व्हावी
केंद्र सरकारने या आगीची गंभीरपणे दखल घेतल्या नंतर सुद्धा पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर सगळी यंत्रणा चुकीची माहिती का सरकारपर्यंत देत होते. हेही ढिसाळ कारभाराचे लक्षण आहे. कारण अग्नीशमन दलाचे लोक संबंधित आग भिजवल्यानंतर हॉलमध्ये जाऊन पोहोचले असताना आणि खिडकीची काच तोडत असताना जर सर्व TV चैनल वरून लाईव्ह बातम्या दाखवल्या जात असतील आणि जीवितहानी झालेली नाही असे सांगितल्यानंतर सुद्धा एका तासाने ५ लोकांच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध होते हे ही संशयास्पद आहे. संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे.

पाच लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
पाच लोकांच्या मृत्यूला ढिसाळ प्रशासन आणि सुस्त यंत्रणा कारणीभूत असावी. कारण सगळ्यांचे ट्विटर किंवा फेसबुक आणि TV चैनल वर प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती ह्या सरासर खोट्या आणि मुख्यमंत्री, केंद्रीय पथक या सगळ्यांना दिशाभूल करणाऱ्या आहेत. एक तर खूप वेळ माहिती लपवली किंवा खरी माहिती समोर येऊ दिली नाही अशी शंका निर्माण होते. महाराष्ट्रात कामात कसूर केल्याबद्दल वारंवार आग लागण्याच्या किंवा जळून होरपळून मरण्याच्या घटना घडत आहेत. 'वीस दिवसातील ही दुसरी घटना आहे.' म्हणून संपूर्ण प्रकाराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोश शिंदे यांनी अशी मागणी केली आहे.

हे वाचा - सीरममध्ये भीषण आग; कोविशिल्ड लसीचा प्लांट सुरक्षित आहे का?

पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यू्टच्या इमारतीतल आज दुपारीच्या दीडच्या सुमारास आग लागली. त्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आगीतून पाच जणांची सुटका करण्यात यश आलं आहे. लस निर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये सीरमचा समावेश होतो. सीरममध्येचे कोरोना प्रतिबंध लसीचं काम सुरू आहे. पण, या आगीत कोरोनाच्या लसीला कोणताही धक्का पोहोचलेला नाही. दरम्यान, दुपारी लागलेली आग विझवण्यात यश आल्यानंतर सायंकाळी त्याच इमारतीत पुन्हा आग भडकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute fire break sambhaji brigade demand cbi investigation