पुणे विद्यापीठाचा हलगर्जीपणा; आजही परीक्षेत व्यत्यय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

सर्व्हर डाउन झाले होते. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तयारी केली होती. मात्र, एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी सिस्टीमला लॉगइन केल्यामुळे, सिस्टीम हँग झाली, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेत मंगळवारी सकाळी सर्व्हर हँग झाल्याने, परीक्षा काही काळासाठी थांबली होती. मात्र एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी लॉगइन केल्याने, ही समस्या निर्माण झाली, हे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले असून यावर उपाय म्हणून मंगळवारी रात्री अकरापर्यत विविध स्लॉटमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, या तांत्रिक अडचणींवर तातडीने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाच्या एकूण एक लाख ७० हजार ९०९ विद्यार्थ्यांची मंगळवारी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाची परीक्षा होती. यापैकी सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक लाख ५४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिली. तर, तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मंगळवारी विद्यार्थी संख्या साधारण एक लाख ७० हजारांच्या दरम्यान आणि ३१७ विषयांच्या परीक्षा होत्या. सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉगइन केले होते. त्यामुळे क्लाउड बेस सिस्टम दहा ते पंधरा मिनिटांसाठी हँग झाली होती. त्यानंतर यंत्रणा सुरळीत करण्यात आली. तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची परीक्षा दोन तास पुढे ढकलण्यात आली होती. साधारणत: रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या मंगळवारच्या परीक्षा सुरू होत्या, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व्हर डाउन झाले होते. त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने तयारी केली होती. मात्र, एकाचवेळी अनेक विद्यार्थ्यांनी सिस्टीमला लॉगइन केल्यामुळे, सिस्टीम हँग झाली, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.

अभियांत्रिकीच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विद्यार्थ्यांचे म्हणणे 
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पीडीडी विषयाच्या ऑनलाइन पेपरमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरील आल्याने, प्रश्नच सोडविता आले नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आपण अनुत्तीर्ण होऊ, या भीतीने विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडविले आणि पेपर सबमिट केला, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

भाषांतरात चुकांमुळे 'एम.कॉम'च्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ
'एम. कॉम'च्या अभ्यासक्रमात मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चुकीच्या भाषांतरीत प्रश्न असल्यामुळे उत्तर देणे अवघड गेले. मराठीत भाषांतरीत प्रश्न अर्धवट येणे, उत्तराचे पर्याय सारखेच असणे, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची संख्या दहा ते बारा होती. त्यामुळे उत्तरे देताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे चुकीचे भाषांतर झालेले प्रश्न विद्यापीठाने रद्द करावेत किंवा त्याचे गुण सर्वांना समान गुण द्यावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: server down at the online exam the test was stopped for some time