पुणे जिल्ह्यामधील सात तालुके झाले टॅंकरमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tanker

पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी (ता. १२) जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यामधील सात तालुके झाले टॅंकरमुक्त

पुणे - पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मंगळवारी (ता. १२) जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त झाले आहेत. शिवाय जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या एकूण टॅंकरची संख्या पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी झाली आहे. मात्र भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील शिरूर तालुका अद्यापही तहानलेलाच आहे. या तालुक्यात सर्वाधिक १५ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

दरम्यान, २ जुलैपासून जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने आणखी तीन तालुके टॅंकरमुक्त झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील टॅंकरमुक्त तालुक्यांची संख्या आता सात झाली. जून अखेरीस चार तालुके टॅंकरमुक्त झाले होते. पूर्वीच्या टॅंकरमुक्त चार तालुक्यात दौंड, इंदापूर, मावळ आणि मुळशी यांचा समावेश होता. त्यात आणखी भोर, वेल्हे आणि हवेली या तीन तालुक्यांची भर पडली.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील २२ गावे आणि १९२ वाड्यांना २९ टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरद्वारे ६० हजार ३६५ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. जून अखेरपर्यंत टॅंकरमुक्त चार तालुक्यांचा अपवाद वगळता अन्य नऊ तालुक्यांतील ४३ गावे आणि २८३ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता, असे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

सध्या शिरूर तालुक्यातील सर्वाधिक १५ टॅंकरबरोबरच खेड तालुक्यात सहा आणि आंबेगाव तालुक्यात पाच टॅंकर्स सुरू आहेत. शिवाय बारामती, पुरंदर आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी एक टॅंकर सुरू आहे.

२६ खासगी विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी २६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या खेड तालुक्यातील सर्वाधिक १३ गावे आणि १२६ वाड्यांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यातील सहा गावे व २५ वाड्या, आंबेगाव तालुक्यातील एक गाव आणि ३१ वाड्या, पुरंदर तालुक्यातील एक गाव आणि आठ वाड्या, बारामती तालुक्यातील दोन वाड्या, जुन्नर तालुक्यातील एका गावाला टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: Seven Tahsils In Pune District Became Tanker Free

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneWater supply