esakal | सात दशकांनंतरही "आवाज'चा आवाज! 
sakal

बोलून बातमी शोधा

सात दशकांनंतरही "आवाज'चा आवाज! 

व्यंगचित्रे आदींच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर या अंकाने मोहिनी घातली आहे. या अंकाचे यंदा सत्तरावे वर्षे आहे. त्यानिमित्त "आवाज'चे संपादक-प्रकाशक भारतभूषण पाटकर यांच्याशी साधलेला संवाद. 

सात दशकांनंतरही "आवाज'चा आवाज! 

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

विनोदी दिवाळी अंकामध्ये "आवाज'ने मोठी उंची गाठली आहे. विनोदी कथा, खिडकीचित्रे, विडंबन गीते, व्यंगचित्रे आदींच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर या अंकाने मोहिनी घातली आहे. या अंकाचे यंदा सत्तरावे वर्षे आहे. त्यानिमित्त "आवाज'चे संपादक-प्रकाशक भारतभूषण पाटकर यांच्याशी साधलेला संवाद. 

1) गेल्या सत्तर वर्षांत "आवाज'मध्ये काय बदल झाले? 
ः माझे वडील मधुकर पाटकर यांनी 1951 मध्ये "आवाज'चा पहिला अंक काढला. त्यावेळी त्याचे स्वरूप संमिश्र होते. संपूर्ण विनोदी दिवाळी अंक अशी त्याची रचना 1954 पासून सुरू झाली. त्यावेळी आचार्य अत्रे, पु., ल. देशपांडे, दत्तू बांदेकर, जयवंत दळवी, मधू मंगेश कर्णिक, गंगाधर गाडगीळ, वसंत सबनीस, बाळ गाडगीळ, मधू मंगेश कर्णिक, ग. दि. माडगूळकर आदी बिनीचे शिलेदार या अंकात लिहीत असत. वाचकांना केंद्रबिंदू मानून काळानुसार अंकाच्या रचनेत व सजावटीमध्ये बदल होत गेला. 

2) खिडकीचित्रे हा अंकाचा "यूएसपी' मानला जातो. त्याची सुरुवात कशी झाली? 
ः दिवाळी अंकांमध्ये खिडकीचित्रे हा प्रकार "आवाज'ने पहिल्यांदा आणला. 1960 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व श्रीकांत ठाकरे हे "आवाज'साठी व्यंगचित्रे काढत असत. त्यावेळी माझ्या वडिलांच्या डोक्‍यात खिडकीचित्रांची कल्पना आली. याबाबत त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा केली. त्यांना ही कल्पना फारच आवडली. "आवाज'चे पहिले खिडकीचित्र हे बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आहे, ही बाब मला अभिमानाने सांगावीशी वाटते. 

3) गुजराती भाषेतील अनुभव कसा होता? 
मराठीतील "आवाज' प्रचंड लोकप्रिय झाल्याने वडिलांनी गुजरातीत "आवाज' काढला; पण मराठीतील साहित्य गुजरातीत भाषांतरित न करता त्यांनी गुजरातीमधील आघाडीच्या सर्व विनोदी लेखकांना "आवाज'मध्ये आणले व गुजरातीत दिवाळी अंक काढून तो यशस्वीरीत्या दहा वर्षे चालवला. मात्र, पुढे व्याप खूप वाढल्याने तो बंद करावा लागला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4) अंकाने खपाचा विक्रम मोडला आहे. तो घेण्यासाठी विक्रेते व वाचकांच्या रांगा लागलेल्या असायच्या. यात कितपत तथ्य आहे? 
ः "आवाज'चा अंक खरेदी करण्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग अत्यावश्‍यक असायचे. त्याचे कुपन आम्ही द्यायचो. गिरगावमध्ये अंकाच्या बायडिंगचे काम चालायचे. त्यावेळी पहाटेपासून विक्रेते कुपन घेऊन रांगा लावायचे. त्याचबरोबर रोखीने खरेदी करणाऱ्या वाचकांचीही दुसरी रांग लागलेली असायची. अंक हाती आल्यानंतर आमचे मुंबईतील मुख्य वितरक बी. डी. बागवे व पुण्यातील वितरक संदेश एजन्सीचे खरे हे फटाक्‍यांच्या माळा लावून स्वागत करीत असत. 

5)अनेकांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला. याला तुम्ही कायदेशीर अटकाव केला नाही का? 
ः "आवाज'ची नक्कल करणारे पाच-सहा दिवाळी अंक बाजारात आले. यातून काही वाचकांची दिशाभूल झाली. मग आम्ही यावर तोडगा म्हणून "मधुकर पाटकर यांचा आवाज' असे मुखपृष्ठावर प्रसिद्ध करायला लागलो. जे अस्सल असते, तेच टिकते, यावर आमचा विश्‍वास आहे. त्यामुळे कोर्ट-कचेऱ्यांमध्ये आम्ही गेलो नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

6) "आवाज'मधील कथांवर अनेक मराठी चित्रपट निघाले, याविषयी काय सांगाल? 
ः "आवाज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथांवर असंख्य चित्रपट निघाले. वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या कथांवर दादा कोंडके यांनी "सोंगाड्या' व "एकटा जीव सदाशिव' हे चित्रपट काढले. या कथा प्रथम "आवाज'मध्ये आल्या होत्या. 

7) विनोदी लेखक व व्यंगचित्रकार घडविण्याचे काम आजही "आवाज' करीत आहे, याबाबत आपला काय दृष्टिकोन आहे? 
ः दरवर्षी आमच्याकडे अनाहूत साहित्य मोठ्या प्रमाणात येते. हे सर्व साहित्य आम्ही काळजीपूर्वक वाचतो. त्यातील आवडणाऱ्या कथा व व्यंगचित्रे बाजूला काढतो. त्यानंतर संबंधित लेखकांशी, चित्रकारांशी संपर्क साधून, काय बदल करणे आवश्‍यक आहे, याबाबत चर्चा होते. त्यानंतर ती कथा, व्यंगचित्रे प्रसिद्ध केली जातात. आतापर्यंत शेकडो नवोदित लेखकांच्या कथा व चित्रकारांची व्यंगचित्रे या प्रक्रियेनुसार प्रसिद्ध झाली आहेत.