'एमएनजीएल'चे 70 हजार गॅस जोड लटकले 

Seventy Thousand for gas connection of MNGL were pending.jpg
Seventy Thousand for gas connection of MNGL were pending.jpg

पिंपरी : रस्ते खोदाईची परवानगी वेळेवर आणि त्वरीत मिळत नसल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)चे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील सुमारे 70 हजार घरगुती ग्राहकांना (पीएनपी) गॅस जोड देण्याचे काम थंडावले आहे. तसेच पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते खोदाईचे शुल्कही अधिक असल्याने त्याचा विपरीत परिणाम घरगुती गॅस जोडण्यावर होत आहे. 

'एमएनजीएल'चे संचालक (व्यवसाय) सुभाष सोनटक्के म्हणाले,"पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आमचे जवळपास 2 लाख ग्राहक आहेत. त्यापैकी पुण्यातील 65 टक्‍के तर, पिंपरी-चिंचवडमधील 35 टक्के ग्राहकांचा समावेश आहे. एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर गॅस जोडणीसाठी रस्ते खोदाई केल्यावर या दोन्ही ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती एमएनजीएलकडून केली जाते. त्यांचे रस्ते खोदाईचे शुल्कही कमी आहे. याउलट, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये ग्राहकांची भरपूर मागणी आहे. मात्र, दोन्ही पालिका आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून आम्हाला वेळेवर परवानगी मिळत नाही. सुमारे 70 हजार घरगुती ग्राहकांना गॅस जोड देण्याचे काम थंडावले आहे. ग्राहकांच्या घरांपर्यंत गॅस पाईप लाईन टाकून मीटरही बसविण्यात आले आहेत. परंतु, केवळ 2 मीटर ते 1 किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंतच्या रस्ते खोदाईची परवानगी न मिळाल्याने हे सर्व काम थांबले आहे. पावसाळ्याच्या काळात रस्ते खोदाईला मनाई असते. वर्षभरातील केवळ 5 ते 6 महिनेच आम्हाला काम करावे लागते. परंतु, त्यात देखील रस्ते खोदाईचे जादा शुल्क आणि वेळेवर परवानगी मिळत नसल्याने ग्राहकांना गॅस जोड वेळेवर देणे शक्‍य होत नाही.'' 

पिंपरी-चिंचवडमध्ये रस्ते खोदाईसाठी सर्वाधिक शुल्क पुणे महापालिका रस्ते खोदाईसाठी 2 हजार 750 रुपये प्रति मीटर तर पिंपरी-चिंचवड महापालिका 12 हजार ते 20 हजार रुपये प्रति मीटर शुल्क आकारत आहे. या दोन्हींच्या तुलनेत एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) शुल्क अत्यल्प आहेत. एमआयडीसीचे रस्ते खोदाईचे शुल्क 1 हजार रुपये प्रति मीटर तर पीडब्ल्यूडीचे शुल्क त्यापेक्षा कमी असल्याचेही सुभाष सोनटक्के यांनी निदर्शनास आणून दिले. 

"पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त आहेत. पिंपरी-चिंचवडमधील रस्ते खोदाईचे शुल्क किती असावे ही धोरणात्मक बाब आहे. त्याबद्दल, 'एमएनजीएल'ने पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी बोलून निर्णय घ्यावा. आमच्याकडून 'एमएनजीएल'सहीत सर्व उद्योगांना रस्ते खोदाईच्या परवानग्या वेळेवर दिल्या जातात. किंबहुना सांगवी भागांत आम्ही त्यांना रितसर परवानग्या देऊन गॅस जोडण्या देण्याबद्दल वेळोवेळी कळविले होते. परंतु, त्यांच्याकडूनच वेळेवर कार्यवाही झाली नाही. सध्या 'एमएनजीएल'कडूनच पालिकेकडे परवानगी मिळविण्याबाबतचे अर्ज येणे कमी झाले आहे.''
- शिरीष पोरेडी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

'एमएनजीएल'च्या कार्यावर दृष्टिक्षेप 
- पुणे जिल्हा परिसरात "एमएनजीएल'च्या एकूण 1500 किलोमीटरच्या गॅस पाईप लाईन 
- पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, हिंजवडी, तळेगाव भागांचा मुख्यत्वे समावेश 
- बॉम्बे हाय आणि कावेरी खोऱ्यामधून नैसर्गिक वायूंचे उत्पादन, उर्वरीत 50 टक्‍क्‍यांची आयात. 
- दर महिन्याला बदलतात नैसर्गिक वायूचे दर 
- सध्या घरगुती वापरासाठी (पीएनजी) 29.20 रुपये प्रति स्टॅंडर्ड क्‍युबिक मीटर इतका दर लागू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com