सेक्‍स वर्कर येताहेत मुख्य प्रवाहात; मुलांच्या शिक्षणासही देताहेत प्राधान्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prostitution

कधी कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून, कधी मजबुरीमुळे, कधी सर्वस्व बहाल केलेल्या प्रियकराच्या विश्‍वासघातामुळे अनेक महिलांवर वेश्‍याव्यवसायात येण्याची वेळ येते.

सेक्‍स वर्कर येताहेत मुख्य प्रवाहात; मुलांच्या शिक्षणासही देताहेत प्राधान्य

पुणे - कर्नाटकला घरची परिस्थिती गरीबीची. कोवळ्या वयातच कविता (नाव बदलेले आहे) पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्‍यावस्तीमध्ये आल्या. तेथे आयुष्याची २५ वर्षे त्यांनी सेक्‍स वर्कर (लैंगिक श्रमजीवी) म्हणून खर्ची घातली. पै-पै जमवून कुटुंबाला जगविले, मुलाला ‘बीबीए’पर्यंत शिकविले. त्यामुळे हे काम करण्याची त्यांची इच्छा होईना, अखेर त्या सेक्‍स वर्करच्या कामापासून दूर झाल्या. एका संस्थेच्या मदतीने अक्षरओळखही केली. त्यानंतर कर्नाटकहून मसाला बनवून त्या आता पुण्यात घरोघरी, दुकानात विक्री करून पैसे कमावू लागल्या. तितक्‍याच स्वाभिमानाने, स्वतः जगू लागल्या, मुलालाही शिकवू लागल्या. याच आयुष्यात पुनर्जन्म घडवून आणणारी ही कहानी एकट्या कविता यांची नाही, तर वेश्‍याव्यवसायातून बाहेर पडलेल्या १००-१२५ महिलांची आहे.

कधी कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून, कधी मजबुरीमुळे, कधी सर्वस्व बहाल केलेल्या प्रियकराच्या विश्‍वासघातामुळे अनेक महिलांवर वेश्‍याव्यवसायात येण्याची वेळ येते. काही दिवसांनी मनाला मुरड घालून ते ठिकाणच आपले आयुष्य आहे, या भावनेतून या महिला एक-एक दिवस काढतात. येणाऱ्या संकटांना तोंड देतात. काही महिला संपूर्ण आयुष्य याच व्यवसायात घालून जगत राहतात. मात्र, काही महिला त्याला अपवाद ठरतात. वेश्‍याव्यस्तीत घालविणाऱ्या कवितासारख्या सव्वाशेहून अधिक महिलांनी ‘सेक्‍स वर्कर’चे काम सोडून स्वतःच्या आयुष्यात नवा बदल घडवून आणला आहे. स्वतःच्या मनाने किंवा मुलांच्या भविष्याचा विचार करून काही महिलांनी छोटे, मोठे व्यवसाय, विविध प्रकारची कामे करून पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वेश्‍यावस्तीमध्ये काम करणाऱ्या सहेली संघ या संस्थेच्या माध्यमातून सेक्‍स वर्कर महिलांचे आरोग्य, मुलांचे शिक्षण, कायदेशीर हक्कांसाठी काम केले जाते. त्याचबरोबर त्यांच्या उन्नतीकडेही लक्ष दिले जाते. दरम्यान, अनेक वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर मागील काही वर्षांपासून संबंधित महिलांनी व्यवसाय, नोकरी, घरकाम अशी कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन करण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही त्यांना लक्ष देता येऊ लागले आहे. काही महिलांचे छोटे, मोठे व्यवसाय हळूहळू स्थिर होऊ लागले आहेत. घरकाम, मुले सांभाळणे, डबे बनवून देणे, स्वच्छतेची कामे अशी कामेही त्यांना मिळू लागली आहेत. सहेली संघ संस्थेकडूनही काही समाजसेवी संस्थांमार्फत त्यांना कामे मिळवून दिली जात असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आता समाधान झळकू लागले आहे.

‘संधीचे सोने करू...’

अनेक महिलांना स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे आहेत, चांगल्या ठिकाणी कामेही करायची आहेत. मात्र, शिक्षणाचा अभाव व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे त्यांना योग्य संधी मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. कोणी आपल्याला काम करण्याची संधी दिली, तर त्याचे नक्कीच सोने करू, अशी भावनाही काही महिलांनी व्यक्त केली आहे.

सेक्‍स वर्कर/लैंगिक श्रमजीवीच म्हणा...

देहविक्रय हा शब्द देहाची विक्री असा होऊ शकतो किंवा मानवी तस्करी (ह्यूमन ट्रॅफिकिंग) असा होऊ शकतो. त्यामुळे देहविक्रय हा शब्द वापरू नये, त्याऐवजी सेक्‍स वर्कर किंवा लैंगिक श्रमजीवी हा शब्द वापरणे योग्य होईल. लैंगिक श्रमजीवी या शब्दामुळे या महिलांची प्रतिष्ठा, त्यांचा मान-सन्मानही राखला जातो. त्यामुळे याच शब्दांचा वापर करावा, अशी मागणी सेक्‍स वर्कर महिलांसाठी काम करणाऱ्या सहेली संघाच्या कार्यकारी संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी केली आहे.

व्यवसाय, नोकरीकडे वळण्याची कारणे

  • सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याची ओढ

  • मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे

  • शिक्षणाच्या अभावामुळे काम मिळण्यास अडचण

  • महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात अद्याप बदल नाही

मी आंध्र प्रदेशातील आहे. गरिबीमुळे या क्षेत्रात आले. तेव्हा काही कळत नव्हते. मुले मोठी झाली, तसे या क्षेत्रातून बाहेर पडावे वाटत होते. त्यानुसार, १५ वर्षांपूर्वी त्यातून बाहेर पडले. आता जेवणाचे डबे देणे, घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. मुलगा कंपनीत कामाला आहे, सून शिक्षिका आहे. आता आयुष्य समाधानाने जगत आहे.

- रेश्‍मा (नाव बदलेले आहे)

अनेक महिला स्वेच्छेने किंवा परिस्थितीमुळे या क्षेत्रात येतात. १२५ हून अधिक महिलांनी व्यवसाय, नोकरीचा वेगळा मार्ग आता निवडला आहे. त्यांना वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम आम्ही करीत आहोत. अनेक जणी चांगल्या स्थिरावल्या असून त्यांची मुले चांगले शिक्षण घेत आहेत. काही जण नोकरीलाही लागले आहेत.

- तेजस्वी सेवेकरी, कार्यकारी संचालक, सहेली संघ

Web Title: Sex Workers Are Coming Into Mainstream Priority Also Given Education Of Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..