बालसुधारगृहात लैंगिक शोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालसुधारगृहात लैंगिक शोषण

बालसुधारगृहात लैंगिक शोषण

मंचर - पुण्यात शिवाजीनगर येथे राज्य सरकारचे बालसुधारगृह कार्यरत आहे. या सुधारगृहात इ- लर्निंगच्या पडद्यावर अश्‍लील चित्रफीत दाखवून मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी आठ अल्पवयीन मुले व इतर दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये अधीक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

याबाबत सह्याद्री आदिवासी ग्रामविकास प्रतिष्ठान (मंचर) संचलित अनाथ व निराधार मुलांचे संगोपन केंद्र- बालगृह (पळस्टिका- घोडेगाव, ता. आंबेगाव) या संस्थेचे सचिव विलास पंदारे यांनी घोडेगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. शिवाजीनगर बालसुधारगृहातील चौदा मुलांचे पळस्टिका बालगृहाकडे हस्तांतर झाले आहे. या मुलांची वागणूक विक्षिप्त असल्याचे पंदारे यांच्या लक्षात आले. त्यांनी मुलांना विश्‍वासात घेऊन चर्चा केली.

त्यातून असे समजले की, संबंधित शिक्षक व कर्मचारी मुलांना अश्‍लील चित्रफीत दाखवत होते, याबाबत मुलांनी तक्रार केली असता, अधीक्षकांनी त्यांना मारहाण व दमदाटी करून गप्प बसविले. यापुढे वाच्यता केल्यास सुधारगृहातून काढून टाकू, अशी धमकी दिली. मुलांच्या लैंगिक छळाबरोबरच मद्यपान व जुगार खेळण्याचा प्रकारही राजरोसपणे सुरू होता. 

पंदारे यांनी १४ ऑक्‍टोबर २०१६ रोजी महिला व बालकल्याण आयुक्‍त, अपंग कल्याण आयुक्‍त (पुणे) व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे सदर प्रकार कळविला; पण अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

सोमवारी (ता. ८) शिवाजीनगर येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व फौजदार स्वाती देवधर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ पंदारे यांना घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी लैंगिक व मानसिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल करू नये म्हणून माझ्यावर गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून दबाव आणला जात आहे. तक्रार दाखल केल्यानंतर सात महिने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. अत्याचारग्रस्त मुलांना न्याय मिळावा, यासाठी या प्रकरणाची चौकशी व्हावी.
- विलास पंदारे, सचिव, अनाथ व निराधार मुलांचे संगोपन केंद्र, पळस्टिका

Web Title: Sexual Abuse Child Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top