चला वारीला : वाटे तुडवू काटेकुटे, तेव्हा विठाई उरी भेटे

warkri.jpg
warkri.jpg

Wari 2020 : अवघड दिवे घाट चढून आल्यावर सासवडला दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी असतो. त्यामुळे दुसरा दिवस तसा आरामाचा... या दोन दिवशी सासवडला जणू यात्राच भरते. पुरंदरच्या पंचक्रोशीतून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सासवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा परिसर वारकऱ्यांच्या दिंड्यांनी भरून गेलेला असतो. रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची गर्दी असते. कपाळी गंध लावून मुले फिरत असतात. छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सारे माऊलींच्या दर्शनाच्या ओढीने येत असतात. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या उपस्थितीत धाकटे बंधू सोपानदेवांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जणू माऊली सोपानदेवांना पुढे घेतात. माऊलींच्या सोहळ्यातील वारकरी सोपानदेवांच्या समाधीचे रांग लावून दर्शन घेतात. नैमित्यिक पूजाअर्चा करून वारकरी आजचा दिवस विश्रांतीसाठीच देतात. अवघड दिवे घाटाची चढण आणि 32 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर थकवा येणे स्वाभाविकच आहे.

नामस्मरणात चालताना काही वाटत नाही, मात्र थांबल्यानंतर पाय बोलणारच ना..! परंतु वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची ओढ इतकी तीव्र असते की शरीराला होणाऱ्या वेदनाही वारीत बोथड बनतात. काही झाले तरी त्याचा गजर करीत, त्याची वारी त्याच्या चरणी पूर्ण करायची, हे वारकऱ्यांच्या मनाने पक्के ठरलेले असते. त्यामुळे हे चालल्यावर पाय दुखणार, ही आपल्यासारख्यांची कारणे वारकरी कधीच देत नाहीत. याबाबतचा किस्सा आठवला तो सांगतो. आम्ही सर्व पत्रकार विसाव्याला किंवा जेवणाच्या ठिकाणी देवस्थानच्या तंबूत जाऊन बसायचो... तेथे कोणाला काही अडचणी आल्या तर समजायच्या म्हणून. देवस्थानचेही काही निवेदन असेल तर तेही आम्हाला तेथेच कळायचे. तेव्हा काही आधिकारीही तेथे येतात, काही कमी जास्त आहे का विचारायला. विश्वस्त मंडळ त्यांच्याशी चर्चा करते. तेव्हा आम्हाला बातमीचे काही विषय मिळतात. रस्ता खराब असल्याचा विषय निघाला, तेव्हा साइडपट्ट्या भरल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. अधिकारी निघून गेले. तेथे संतानाना चोपदार बसले होते. निष्ठावान माणूस. बोलायला खूप कडक पण मनाने तितकाच मोकळा...

आम्ही त्यांना विचारले, काय वाटते नाना तुम्हाला रस्त्याबाबत. नाना उखडलेच आमच्यावर. रस्ता खराब आहे म्हणून काय झाले? तेव्हा नाना जे वाक्य बोलले ते माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले, ‘माऊलीच्या सोबतीने देवाकडे जाताना वारकऱ्याला जेवढी सोय, तेवढी ती गैरसोय असते आणि जेवढी गैरसोय, तेवढी सोय असते.’ आम्हाला ते बोलणे झेपलेच नाही. म्हणून मी खोदून विचारले, कसं नाना? तेव्हा ते म्हणाले, देवाकडे जाताना जेवढी गैरसोय होईल, तेवढी पारमार्थिक अर्थाने ती देवावरील भक्ती वाढविण्यास सोयीची असते. पण चालताना जेवढी सोय होईल, तेवढे कष्ट कमी होतील. स्वाभाविकच पारमार्थिक साधना म्हणजे कायिक वारीतील साधना कमी होत जाते. म्हणून सोय तेवढी गैरसोय. आम्ही नानांचे दर्शन घेतले आणि मार्गाला लागलो. तेव्हा कळाले, किती आध्यात्म जगतात ही माणसे...! वारीत वारकऱ्याच्या प्रत्येक कर्माला तात्विक अर्थ असतो, हे नानांच्या एका वाक्यातून जाणवले. तेव्हा कळाले ही वारी म्हणजे नुसते चालत पंढरपूरला जाणे, विठ्ठलाच्या पाया पडणे आणि घरी येणे, असे नाही. ही वारी सात्विक कर्मभावना जगणारी वारी आहे. त्यानंतर आपले (नसलेले) बौद्धिक डोके वारकऱ्यांच्या भावनांशी कधी लावायचे नाही. आपली मर्यादा तेव्हा मी आखून घेतली. त्यानंतर अनेक गोष्टी मला अनुभूतीला आल्या. कारण नानांच्या माध्यमातून वारकरी म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, याचा एक प्रकारे पाठच आम्हा पत्रकारांना मिळाला. असो. सासवडला मुक्कामामुळे सारे निवांत तंबूत असतात.

यंदा सारे काही वेगळेच आहे. माऊलींची पालखी सोहळाच निघाला नाही. हे सासवडकरांसह प्रत्येक गावकऱ्याच्या पचनी पडणे अवघड आहे. कारण वारीच्या मार्गावर गावांचे वारकऱ्यांशी नाते जुळलेले असते. न्याहारीला, जेवणाला, मुक्कामाला ज्या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांचीही नाळ जुळलेली असते. त्यामुळे ते बेचैन होणे स्वाभाविक आहे. यंदा माऊलींचा सोहळा सासवडनगरीत नाही. तेथील ग्रामस्थांना सुनेसुने वाटणार. यंदा माऊली गावात न आल्याने सोपानदेवही हिरमुसले असणार. पंढरपूर जवळ आल्यावर माऊलींची भेट होते. पण त्याआधी माऊलींचे त्यांच्या नगरीत आगमन होते. तेव्हा निश्चित सोपानदेवांना आनंद होत असणार. पण आज मात्र माऊली ना सासवडला आले, ना टप्प्याजवळ सोपानदेव माऊली भेट होणार. यंदा भेटीचा सोहळा होणार नाही, याचे शल्य निश्चित सोपानदेवांना असणार. कोरोनाच्या साथीने साऱ्या परंपरांना यंदा छेद गेला. पण त्या परंपरा पुढे नित्यनेमाने सुरू राहतील, याबाबत एकाही वारकऱ्याच्या मनात शंका नाही... हे दिवसही जातील.... कोरोना हरेल अन् परंपरा जिंकतील...!
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com