कोरोनामुळे लोककलावंतांचीही उपासमार; 'शांताबाई' फेम गायक संजय लोंढे अन्नधान्यासाठी रांगेत

अनिल सावळे
मंगळवार, 7 एप्रिल 2020

हातावर पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांना दररोज मजुरी करून धान्य आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब नागरिकांच्या समोर दररोज आपल्या मुलाबाळांचे पोट कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यातच लोककलावंतांची परिस्थितीही वेगळी राहिलेली नाही. ​

पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर झोपडपट्टीतील गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्यासाठी झगडावे लागत आहे. त्याचप्रमाणे गरीब लोककलावंतांचीही उपासमार होऊ लागली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या गाण्यामुळे धमाल उडवून देणाऱ्या 'शांताबाई' फेम गायक आणि अस्सल लोककलावंत संजय लोंढे यालाही त्याचा फटका बसला. परंतु पुण्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी या भागातील लोककलावंतांना तातडीने अन्नधान्याची मदत पुरविली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हातावर पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांना दररोज मजुरी करून धान्य आणून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब नागरिकांच्या समोर दररोज आपल्या मुलाबाळांचे पोट कसे करायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यातच लोककलावंतांची परिस्थितीही वेगळी राहिलेली नाही. काही ठिकाणी गरीब, बेघर मजुरांना अन्नधान्याचे वाटप सुरू असतानाच मंगळवार पेठेतील राजेवाडी येथील झोपडपट्टी भागातून तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना फोन आला. राजेवाडी येथे गरीब लोकांना धान्य मिळत नाही, अशी तक्रार आली. त्यावर कोलते-पाटील यांनी लगेच या भागात जाऊन धान्याचे वितरण केले. तेथे या भागातील गरजू लोककलावंतांमध्ये गायक, ढोलकी वादक आणि वादक यांचा समावेश होता. त्यांना सोशल डिस्टन्स राखत धान्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी 'शांताबाई' फेम गायक- संगीतकार संजय लोंढे या रांगेत उभे होते. आपल्या 'शांताबाई' या गाण्याने लाखो लोकांच्या 'मनाला भुलवि'णाऱ्या या उपेक्षित लोककलावंताची ही परिस्थिती पाहून या अधिकाऱ्याच्या 'जिवाचा कालवा' न झाला तरच नवल.

coronavirus: आजपासून बारामतीकरांची खरी परिक्षा! 

एप्रिल-मे महिन्यात तमाशा, लोकसंगीत अशा कार्यक्रमांचा सीझन असतो. परंतु कोरोनामुळे सर्व 'शो' रद्द झाले. आज 7 एप्रिलला माझा वाढदिवस असतो. त्यामुळे लोणावळ्यात आयोजकांकडून एक 'शो' ठेवण्यात आला होता. परंतु तोही रद्द झाला. खिशात दमडी नसल्यामुळे डोळ्यासमोर केवळ अंधार आहे, सरकारकडून लोककलावंतांना मदतीचा हात मिळत नाही. कांदे, टमाटे आणण्यासाठीही खिशात पैसे नाहीत. मायबाप रसिकांनी आता मदतीचा हात पुढे करावा, एवढीच विनंती.
- संजय लोंढे, गायक

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

झोपडपट्ट्यांमध्ये आणि निवारा केंद्रात अन्नधान्याचे वाटप केले जात आहे. त्याप्रमाणे गरीब, गरजू लोककलावंतांच्या अडचणीकडे लक्ष दिले पाहिजे. या भावनेतून तातडीने धान्य, किराणा सामान पुरविण्यात आले. सामाजिक संस्था आणि दानशूर लोकांनी गरीब नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे.
- तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार पुणे शहर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shantabai fame singer Sanjay Londhe lined up for grains