Sharad Pawar : नरेंद्र मोदी सरकारकडून सुसंवादच संपविला गेला- शरद पवार

पंतप्रधान व अर्थमंत्र्यांवर सडकून केली टीका....
sharad pawar criticize pm modi india economy baramati politics
sharad pawar criticize pm modi india economy baramati politicssakal

बारामती : देशातील उत्पादक, व्यापारी यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा पंतप्रधान, अर्थमंत्री व कृषीमंत्री यांचा सकारात्मक दृष्टीकोन नाही, प्रश्नांवर चर्चाच करायची नाही, अशी या सरकारची भूमिका आहे, सुसंवादच संपल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पवार यांनी सडकून टीका केली.

दिवाळी पाडव्यानिमित्त मर्चंटस असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी मेळाव्यात शरद पवार बोलत होते. वालचंद संचेती, राजेंद्र गुगळे, संभाजी किर्वे, जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, पौर्णिमा तावरे, सुशील सोमाणी, सचिन सातव, सुनील पवार या प्रसंगी उपस्थित होते.

पवार यांनी आपल्या 35 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, मी राज्यसभेत खासदार आहे, गेल्या दोन अधिवेशनात पंतप्रधान राज्यसभेत तासभरही आलेले नाहीत,

अर्थमंत्र्यांनी विविध विषयांसंदर्भात खासदारांना विश्वासात घेऊन चर्चा करुन त्यातून प्रश्न सोडवायचे असतात याचा विसरच सध्याच्या सरकारला पडला आहे. संसदेची प्रतिष्ठाच धोक्यात आली आहे की काय असे वातावरण राज्यकर्त्यांनी तयार केलेले आहे.

व्यापारी, उत्पादक यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी देशाच्या अर्थमंत्र्यांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवायला हवा, दुर्देवाने असा सुसंवाद करण्याची पध्दतच सरकारने बंद केलेली दिसते. केवळ माझीच नाही तर संसदेतील अनेक खासदारांचीही पंतप्रधान व अर्थमंत्री चर्चाच करत नाही अशीच भूमिका आहे.

सहकारी मंत्र्यांच्या खात्यात अजिबात हस्तक्षेपच करायचा नाही अशी पंतप्रधानांची भूमिका दिसते, ते एका अर्थाने चांगलेही आहे पण प्रश्न सोडविण्यासाठी नंबर एकच्या व्यक्तीने प्रसंगी हस्तक्षेप करायला हवा, तसे होताना दिसत नाही. राजकारणात राज्यकर्त्यांना अधिक रस दिसतो, मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन पक्ष फोडाफोडीमध्येच अधिक लक्ष दिले जात असून लोकांमधील अंतर वाढविण्याचे काम नेतृत्वाकडून केले जात असल्याची टीका पवार यांनी केली.

पंतप्रधानांकडून शब्दांचा जपून वापर हवा...

निवडणूकीच्या निमित्ताने एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना त्यांनी राज्य खाल्ले अशी टीका केली. मी इंदिरा गांधी यांच्यासह अनेक पंतप्रधानांचे कामकाज जवळून पाहिले आहे, पंतप्रधानांकडून जर असे आरोप या भाषेत व्हायला लागले तर लोकांनीच आता याचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.

एखाद्या राज्याच्या प्रमुखाची अप्रतिष्ठा होईल असे शब्द पंतप्रधानांनी वापरणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. लोकशाही जपायची असेल तर काही पथ्ये व मर्यादा पाळायला हव्यात, अशा शब्दात पवारांनी मोदींना सुनावले.

चर्चा बंदची कन्सेप्ट रुढ झाली...

या सरकारने चर्चेची दारे बंद केल्याचे वातावरण आहे. महत्वाची धोरणे निश्चित करताना निर्णय घेताना व्यापारी, उत्पादक यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. चर्चेची दारे बंद झाल्याची किंमत व्यापारी व उत्पादकांना मोजावी लागत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. प्रश्न ऐकून घेत सोडविण्याचा राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा, दुर्देवाने ही प्रथाच बंद झाली आहे.

सुसंवाद बंद करणा-या सरकारबद्दल लोकांनीच आता फेरविचार करायला पाहिजे असेही पवार यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com