
पवारांचं नवं राजकीय समीकरण? पुण्यात आज ब्राह्मण समाजासोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज राज्यातील ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. या चर्चेसाठी २० ते २२ संघटनांना शरद पवारांनी निमंत्रण दिले आहे. (Sharad Pawar Holds Meeting with Brahmin Community)
राज्यात सध्या राष्ट्रवादी आणि शरद पवार हे ब्राह्मणविरोधी असल्याची प्रतिमा तयार होत आहे. विविध संघटनांनी पवारांच्या काही भूमिकांवर निषेध नोंदवलाय. तर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ब्राह्मण व पौरोहित्य करणाऱ्यांविरोधात वक्तव्य केल्याने समाजात राष्ट्रवादीविरोधात असंतोष आहे. त्यासाठी शरद पवार आता नवी राजकीय समीकरणं बांधत असल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे यांनीही शरद पवारांवर आरोप करत ते ब्राह्मणविरोधी असल्याची टिप्पणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही याची चर्चा रंगली. अखेर अखिल भारतीय ब्राह्मण संघटनेच्या गोविंद कुलकर्णी यांनी पवारांसोबत बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. यानंतर आता बैठक पार पडत आहे. (Sharad Pawar News)
हेही वाचा: आनंद दवे आणि काही ब्राह्मण संघटनानी पवारांचे आमंत्रण नाकारलं
राज्यात सध्या केतकी चितळे प्रकरणात शरद पवार यांचा प्रामुख्याने उल्लेख झाला आहे. केतकीला काही ब्राह्मण समुदायातील काही व्यक्तींनी पाठिंबा दिल्याचंही सोशल मीडियावर स्पष्ट झालं आहे.
यासोबतच राज्यभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण तापू लागलंय. संभाजीराजे छत्रपती यांनी ही जागा अपक्ष लढवणार आसल्याचं स्पष्ट केलं. २०१६ मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, भाजपने त्यांची शिफारस केल्यामुळे शरद पवारांनी टोला लगावला होता. इतिहासात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत असत. मात्र आता पेशवेच छत्रपतींची निवड करू लागले आहेत, असं पवार यांनी म्हटलं होतं.
मात्र यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांनीच सर्वात आधी संभाजीराजेंना आपला पाठिंबा जाहीर करून भाजपची कोंडी केली आहे. पवारांनी छत्रपतींना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनाही पेचात पडली. यानंतर आता पवारांनी ब्राह्मण समाजाला भेटीचं आमंत्रण दिलंय. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालया हा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे पवारांनी नव्या राजकीय समीकरणांचा डाव मांडल्याची चर्चा आहे.
चोख बंदोबस्त
सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमात कोणालाही पेन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच पाण्याच्या बाटल्या व बॅग नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि नंबर नोंदणीचे काम सुरू झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वांची माहिती असावी यासाठी असे केले जात आहे. याच कारणास्तव पवारांच्या कार्यक्रमाला मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
Web Title: Sharad Pawar Meets Bramhin Mahasangh Members In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..