'त्या' बालिकेसाठी सुप्रिया सुळेंनी शोधली देशभरात औषधे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

 एका बालिकेला अत्यावश्यक असलेले औषधे लॉकडाउनमुळे मिळत नव्हती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण देशभरात शोध घेऊन तिला थेट दिल्लीवरून औषधे मिळवून दिली.  

बारामती- दुर्धर आजाराशी सामना करत असलेल्या एका बालिकेला अत्यावश्यक असलेले औषधे लॉकडाउनमुळे मिळत नव्हती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण देशभरात शोध घेऊन तिला थेट दिल्लीवरून औषधे मिळवून दिली. त्यामुळे तिच्यावर ओढवू पाहणारा दुर्धर प्रसंग टळला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यवतमाळ जिल्ह्यातील वरुड (ता. पुसद) या गावातली अवघ्या पाच वर्षांची बालिका एका दुर्धर आजाराशी सामना करत होती. त्यामुळे तिच्यावर मुंबई येथील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पुढील तपासणीसाठी तिला नागपूर येथील रूग्णालयात दाखल केले. आवश्यक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली. नेमके त्याच दिवशी देशात लॉकडाउन सुरु झाले. तसेच, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे भारतात कुठेही मिळणार नाहीत, केवळ अमेरिकेत मिळतील, असे त्या मुलीच्या वडिलांना सांगण्यात आले होते. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पोटच्या गोळ्याचा जीवनमरणाचा प्रश्न होता. एकीकडे संपूर्ण देशात बंदी आणि औषध मिळवायचे तर थेट परदेशातून कसे जायचे, या विचारांनी अस्वस्थ झालेल्या त्या पित्याने नागपूर, हैदराबादपासून दिल्लीपर्यंतच्या औषध वितरकांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क केले. कोठूनही प्रतिसाद मिळाला नाही. हैदराबाद येथील एका वितरकाने औषधे आहेत, मात्र सव्वालाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तेसुद्धा टाळेबंदी उठल्यानंतर औषधे पाठवतो, असे स्पष्ट केले. त्यावर त्यांनी कॅनडा येथील औषध निर्माण कंपनीत मेल केला. परंतु, तेथूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

हताश झालेल्या या पित्याने अखेर सुप्रिया सुळे यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. सुळे यांनी लागलीच सर्वत्र पाठपुरावा करून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सहकार्याने देशभरातील औषध वितरकांची माहिती घेत दिल्लीमध्ये औषध असल्याचा शोध लावला. विशेष म्हणजे हैदराबादमध्ये तब्बल सव्वालाख रुपये सांगितलेली औषधे अवघ्या सात हजारात मिळाली. 

'सकाळ'च्या पार्सल गाडीचीही मदत 
औषधे मिळाली, पण ती वरुड या गावापर्यंत पोहोचविण्याचे दिव्य पार पाडायचे होते. त्यासाठी दैनिक 'सकाळ'च्या नागपूर आवृत्तीचे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे यांची मदत झाली. कुरियरने औषध नागपूरला पोहचले. तेथून वाहन परवानगीसाठी सलील देशमुख यांनी मदत केली. त्यांच्या सहकार्याने 'सकाळ'च्या पार्सल गाडीतून ते औषध पुसद आणि तेथून वरुड गावी त्या मुलीच्या घरी पोहोचविण्यात आली. घरी आलेली औषधे पाहून त्या मुलीच्या वडीलांचे डोळे पाणावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She got her medicine directly from Delhi through the efforts of Supriya Sule