पुरस्काराकडे पाठ फिरवुन "ती'ने वाचविला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Women Day

जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला एकीकडे महिलांचा कौतुक सोहळा सुरू होता, तर दुसरीकडे सासरच्या जाचाला कंटाळून एक महिला कालव्यातील पाण्यात जीव देण्याचा प्रयत्न करीत होती.

पुरस्काराकडे पाठ फिरवुन "ती'ने वाचविला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव !

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त (World Womens Day) 8 मार्चला एकीकडे महिलांचा (Women) कौतुक सोहळा (Honor Program) सुरू होता, तर दुसरीकडे सासरच्या जाचाला कंटाळून एक महिला कालव्यातील पाण्यात जीव देण्याचा प्रयत्न करीत होती. कालव्याजवळ अश्रू ढाळत बसली होती. त्याचवेळी महापालिका शाळेच्या त्यांना मिळणारा एक पुरस्कार (Award) घेण्यासाठी कार्यक्रमाला निघाल्या होत्या. त्यांच्या कानावर त्या महिलेचे हुंदके पडले. विचारपुस केल्यानंतर सासु-पतीच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे तिने सांगितले. क्षणभर त्याही थबकल्या. तरीही त्यांनी मोठ्या बहिणीच्या नात्याने समजूत काढली, पोलिसांना बोलाविले. तिला घरी नेऊन पती, सासूला कायद्याच्या भाषेत सडेतोड उत्तर दिले, त्यांनी तिला घरात घेताच तिच्या अन्‌ तिच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसु फुलले ! इकडे, शिक्षिकेचा पुरस्कार हुकला खरा, पण पुरस्कारापेक्षाही तिचा जीव वाचविण्यासारखा खरा पुरस्कार कमाविल्याचा आनंद शिक्षिकेच्या (Teacher) मनात कायमचा रुजला !

राखी रासकर त्या शिक्षिकेचे नाव आहे. रासकर या हिंगणे येथील महापालिकेच्या मुलींची शाळा क्रमांक 115 मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्या सत्यशोधक महिला फाऊंडेशन, अंधजन विकास संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत असतात. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून यंदाही त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी 8 मार्च रोजी एका संस्थेकडून पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. शाळेनंतर त्या पुरस्कार घेण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. तेवढ्यात त्यांना हिंगण्यातील साईनगर येथील कालव्याजवळ बसलेल्या एका महिलेच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून महिलेची विचारपुस केली.

हेही वाचा: सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राजुरी, उंचखडक गावात प्रथमच बैलगाडा शर्यतींचा रंगणार थरार

'माझे लग्न होऊन 17 वर्ष झाली. 3 मुली, एक मुलगा आहे. पती, सासू सतत मानसिक व शारिरीक त्रास देतात. त्यामुळे मी आता जीव देऊन आयुष्य संपविणार आहे.'' असे सांगत त्या महिलेने तिचे दुःख मांडले. रासकर यांनी तिची खुप वेळ समजूत काढली. "मी तुमची मोठी बहिण आहे, असे समजा. आत्महत्येचा विचार मनातून काढा. तुमच्या घरी जा किंवा माझ्या घरी चला' अशा शब्दात तिला विनंती केली. त्यानंतर 100 क्रमांकाला फोन करुन पोलिसांना बोलावून घेतले. संबंधित महिला, रासकर व पोलिस तिच्या घरी पोचले. त्यावेळीही महिलेची सासू, पतीकडून आरडाओरडा सुरु होता. अखेर पोलिसांनी कायद्याची भाषा वापरल्यानंतर ते शांत झाले. महिलेला घरात घेतले. या क्षणाने आत्तापर्यंत स्तब्ध थांबलेल्या महिलेच्या मुलांच्या चेहऱ्यावरही हसू फुलले.

'मला पुरस्कार स्विकारण्यासाठी जाण्यापेक्षा तिचा जीव वाचविणे अधिक महत्वाचे वाटले. मी त्या महिलेला बाकी मदत केली नाही, पण तिला आधार देऊन तिच्या संसारात पुन्हा पोचविल्याचा आनंद मला त्या पुरस्कारापेक्षाही अधिक मौल्यवान वाटतो.'

- राखी रासकर, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या.

...तर 'ते' तिघे वाचले असते !

खेड येथे एका महिलेने तिच्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. या घटनेपुर्वी दुचाकीवरुन जाणाऱ्या एका महिलेने त्यांना तेथे पाहीले होते, परंतु, त्यांनी त्या तिघांची विचारपुस केली नाही, त्या महिला पुढे निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी हि घटना समजल्यानंतर दुचाकीवरुन जाणाऱ्या त्या महिलेला धक्का बसला. कदाचित आपण त्यांची विचारपुस केली असती, तर त्यांचा जीव वाचला असता, हि सल त्यांच्या मनात कायमची राहीली. मात्र रासकार यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वेळीच थांबवुन तिचा जीव वाचविला, तुम्हीही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचाही जीव आपल्या छोट्याशा कृतीतुन वाचवू शकता, असे रासकर यांनी सांगितले.