पुणे महापालिका आयुक्तपदी शेखर गायकवाड

पुणे महापालिका आयुक्तपदी शेखर गायकवाड

पुणे -पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे, तर राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आयुक्तपदावरून राव यांची पावणेदोन वर्षात बदली झाली आहे. 

राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी काढला. त्यात राव आणि गायकवाड यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या बदलीनंतर राव यांची एप्रिल २०१८ मध्ये महापालिका आयुक्तपदावर नेमणूक झाली. या काळात नियोजित मेट्रो, समान पाणीपुरवठा, भामा आसखेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीला त्यांनी गती दिली. तसेच, ‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्या बसगाड्या आणून ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचा प्रश्‍नही त्यांनी सोडविला. वर्षानुवर्ष रेंगाळेल्या ‘एचसीएमटीआर’, नदीसुधार (जायका), नदीकाठ संवर्धन योजनांनाही गती देण्याचा प्रयत्न केला, परंतु, निविदांमधील वादाने त्या योजनांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याशिवाय, महापालिकेत समावेश झालेल्या गावांत पायाभूत सुविधा विस्तारण्यावर राव यांचा भर होता.  

कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली
महापालिकेतील बहुतांश आयुक्तांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कुणाल कुमार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर तीन महिन्यांनी बदली झाली. त्यामुळे त्यांनी सलग चारवेळा महापालिकेचा अर्थसंकल्प मांडला. मात्र, राव यांना एकच अर्थसंकल्प मांडण्याची संधी गेल्या वर्षी मिळाली. ते दुसऱ्यांदा पुढच्या चार-पाच दिवसांत अर्थसंकल्प सादर करणार होते. त्याआधीच त्यांची बदली झाली आहे.

भाजपला रोखण्यासाठी
नवे आयुक्त शेखर गायकवाड हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटचे मानले जातात. पालकमंत्री होताच पवार यांनी पुणे-पिंपरी-चिंचवड महापालिकांत अधिक लक्ष्य घातले असून, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बैठका, निर्णयांचा धडाका लावला आहे. तेव्हाच, राव यांच्या बदलीनंतर आयुक्तपदाची जबाबदारी गायकवाड यांच्यावर सोपविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. महापालिकेत गायकवाड यांना आणून सत्ताधारी भाजपला रोखण्याची नीती पवार यांनी अवलंबल्याची चर्चा आहे.   

इतर बदल्या
मुंबई शहर जिल्हाधिकारी या पदावर मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव राजीव निवतकर यांची नियुक्ती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र आरंभले आहे. याआधी १६ जानेवारीला ठाकरे यांनी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे यांनी आणखी बदल्या करून प्रशासनात खांदेपालट केला आहे.

अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे
अरविंद कुमार (अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास आणि जलसंधारण), दिनेश वाघमारे (अध्यक्ष, महापारेषण), पराग जैन (सचिव, सामाजिक न्याय), राजीव जाधव (सचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय), प्रजक्ता वर्मा (सचिव, मराठी भाषा विभाग), शेखर गायकवाड (आयुक्त, पुणे महापालिका), ए. एम. कवाडे (आयुक्त, सहकार आणि नोंदणी), सौरभ राव (साखर आयुक्त), एस. एस. डुंबरे (महासंचालक, मेडा पुणे), ओमप्रकाश देशमुख (नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक, पुणे), शिवाजी जोंधळे (सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय), कांतिलाल उमाप (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क), आनंद रायते (अतिरिक्त आयुक्त भूमी अभिलेख पुणे), संपदा मेहता (सहआयुक्त विक्रीकर, मुंबई), आयुष प्रसाद (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे), यू. ए. जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला), किरण पाटील (उपसचिव, मुख्य सचिव कार्यालय).

आयुष प्रसाद पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव यांची अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली केली आहे. तर, अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद हे पुणे जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून काम पाहतील. काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याला पूर्णवेळ सहकार आयुक्‍त मिळाले आहेत. नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्‍तपदी बदली केली आहे. तर, नोंदणी महानिरीक्षकपदाचा कार्यभार अतिरिक्‍त जमाबंदी आयुक्‍त ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com