esakal | शेळके यांनी गावासाठी उभारला वॉटर फिल्टर प्रकल्प

बोलून बातमी शोधा

गावासाठी उभारला वॉटर फिल्टर प्रकल्प

गावासाठी उभारला वॉटर फिल्टर प्रकल्प

sakal_logo
By
बंडू दातीर

पौड : पिंपळोली (ता. मुळशी) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उद्योजक बाबाजी सोपान शेळके यांनी स्वखर्चातून गावठाणासाठी एक हजार लिटरचा वॉटर फिल्टर उभारला आहे. वडीलांच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य दिनानिमीत्त त्याचे लोकार्पण करण्यात आले. या फिल्टरमुळे येथील ग्रामस्थांना पाच रूपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. शेळके यांच्या सामाजिक बांधिलकीचे तालुक्यात कौतुक होत आहे. रिहे खोऱ्यातील पिंपळोली ग्रामपंचायतीत गावठाण, शेळकेवाडी, गवारवाडी यांचा समावेश होतो. गाव लहान असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्मयातून रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरविण्यात आघाडीवर आहे.

हेही वाचा: पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार

बाबाजी शेळके यांनी आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत गावचा कायापालट केला. येथील शेळकेवाडीत सामूहिक शेतीचा प्रकल्प राबविला गेला. गावठाणात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. पिंपळोली बंधाऱ्यातून गावठाणात नळपाणीपुरवठा योजना राबविली होती. परंतू बंधाऱ्याचे पाणी अशुद्ध असल्याने ते पिण्यालायक नव्हते. त्यामुळे महीलांना गावाबाहेर असलेल्या विहीरीवरून पाणी उपसून आणावे लागत होते. शेळके यांनी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांना शुद्ध पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीत एक हजार लिटरचा वॉटर फिल्टर प्लॅंट उभारला. गावात येणाऱ्या नळपाणी पुरवठ्याची पाईपलाईऩ टाकीला जोडली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे त्याची जबाबदारी दिली.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

या फिल्टरमुळे ग्रामस्थांना पाच रूपयात वीस लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. मिळणाऱ्या पाच रूपयातून फिल्टरच्या देखभालीचा खर्च केला जाणार आहे. त्याचे लोकार्पण मुळशी, मावळचे प्रांत संदेश शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी बाबाजी शेळके, सरपंच मोरेश्वर घारे, भूमिअभिलेखचे उपअधिक्षक प्रताप चौधरी, माणिकराव शिंदे, अॅड.नरेंद्र निकम, गुलाब शिंदे, किरण शिंदे, मंगेश शिंदे, समीर शिंदे, मल्हार शिंदे, नवनाथ शेळके, संतोष घारे, शोभा शेळके, पोपट उबाळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. शेळके यांच्या या उपक्रमाचे प्रांत शिर्के यांनीही कौतुक केले. आगामी काळात शेळकेवाडी आणि गवारवाडीत वॉटर फिल्टर प्लॅंट उभारणार असल्याचे बाबाजी शेळके यांनी सांगितले.