
पारगाव : शिरदाळे ता.आंबेगाव येथून गेली चाळीस वर्षांपासून सुरू असलेली शिखर शिंगणापूर कावड यात्रा नुकतीच संपन्न झाली. कामदा एकादशीच्या दिवशी कावडीचे प्रस्थान शिखर शिंगणापूरच्या दिशेने करण्यात आले. यावेळी या कावड यात्रेचे संस्थापक पांडुरंग रणपिसे आणि संभाजी सरडे तसेच शिरदाळेचे माजी सरपंच मनोज तांबे,पोंदेवाडी माजी उपसरपंच संदीप पोखरकर, गणेश तांबे तसेच महिला मंडळींच्या हस्ते कावडीची पूजा करण्यात आली. शिरदाळे येथे पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात कावडीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धामणी बाजारपेठेमध्ये कावड नाचवण्याची परंपरा यंदा देखील कायम ठेवण्यात आली. याप्रसंगी धामणी ग्रामस्थांच्या वतीने शंभू महादेवाच्या कावडीची पूजा करून भक्त मंडळींचा सन्मान भाऊसाहेब करंडे यांच्या हस्ते करण्यात आला.