esakal | यश-अपयशाचा विचार न करता कष्ट करा यश तुमचेच; शिल्पा आडम
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Adam

यश-अपयशाचा विचार न करता कष्ट करा यश तुमचेच; शिल्पा आडम

sakal_logo
By
मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट : अतिआत्मविश्वासामुळे अपयश पदरी पडते. व्यासपीठावर काम करण्यासाठी जिद्द, चिकाटी, अभ्यास करीत आत्मविश्वास वाढविला पाहिजे. यश-अपयशाचा विचार न करता जीव ओतून काम केले तर यशाचे मानकरी ठरतो, याचा प्रत्यय मला वारंवार आला आहे. स्थानिक पातळीपासून राज्य आणि आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर कला सादर करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आता दुप्पट वेगाने अभ्यास करत काम करावे लागणार आहे, असे मिसेस इंडिया २०२१च्या मानकरी सौ. शिल्पा मिलिंद आडम यांनी सांगितले.

द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या वतीने ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान सौंदर्य प्रतियोगिता स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये त्या विजयी ठरल्या. या स्पर्धेमध्ये देशभरातून तीन हजारहून अधिक मिसेसचा सहभाग होता. या स्पर्धेत बाह्य सौंदर्य नाही, तर आंतरिक सौंदर्यालाही मोठे महत्त्व देण्यात आले. स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिकांवर हिंदी भाषेतून उत्तरे देत मात केली. इंट्रोडक्शन, प्रेस कॉन्फरन्स, थिम, सेलिब्रेटी आणि त्यानंतर फायनल राऊंड झाला, त्यातून निवड करण्यात आली. शिल्पा आडम या २०२२ मध्ये अमेरिकेमधील मायामी येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

सिनेतारका व मिस इंडिया सेलिना जेटली, डॉ. अदिती गोवित्रीकर, सबिना मर्चेंट, हॉकीपटू युवराज वाल्मिकी, लेखक राधाकिशन पिल्ले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मिसेस शिल्पा आडम म्हणाल्या की, विवाहित महिलांना पतीची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून, अमेरिकेतील मयामी शहरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हिंदी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे. जगामध्ये इंग्रजी भाषेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, मराठी भाषिक मिसेस इंडिया म्हणून राष्ट्रभाषा म्हणजे हिंदीचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री सेलीना जेटली यांनी माझी मुलाखत घेतल्याचे सांगता मनोमन समाधान वाटत आहे. इंग्रजी भाषा स्टेटस म्हणून मानून वेगळेपण दाखविण्यासाठी बोलली जाते. मात्र, आपल्या भाषेला कमी न लेखता तिची उंची वाढविण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आपल्या भाषेतील संभाषण ऐकून इतर भाषिकांनासुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मिसेस सौ. शिल्पा मिलिंद आडम (वय ४४, रा. कल्याणीनगर, वडगावशेरी, पुणे) मूळच्या चंद्रपूरच्या असून, लग्नानंतर त्या सोलापूर आणि सध्या पुणेस्थित आहेत. त्यांना दोन मुली असून, एक आठवी आणि दुसरी बारावीमध्ये शिक्षण घेत आहेत. सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. जी. एस. आडम यांच्या सून आहेत. शिल्पा यांना शालेय जीवनामध्ये कलाक्षेत्राचे आकर्षण होते. पाचवीत असताना पहिल्यांदा अगदी भीत भीतच नाटक आणि नृत्यामध्ये मोहिनीची भूमिका साकारली. त्यानंतर व्यासपीठावर कला सादर करण्याचा आत्मविश्वास वाढला आणि एका पाठोपाठ एक अशा अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, त्यामध्ये ५० हून अधिक राज्यस्तरीय पारितोषिके आणि १०० हून अधिक प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

loading image
go to top