शिरूर : मंदिरांचे दरवाजे उघडले जाणार; भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण

नवरात्रोत्सव साजरा करण्यावरील बंधने मात्र 'जैसे थे' च असल्याने माताभक्तांचा हिरमोड
Temple
TempleSakal

शिरूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताना मंदिरांचे दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यातून आदिशक्तीची मनोभावे आराधना करताना डोळा भरून तीचे दर्शन घेता येणार असल्याने समस्त भाविकांत व विशेषतः महिला वर्गात समाधानाचे वातावरण असताना; नवरात्रोत्सव साजरा करण्यावरील बंधने मात्र 'जैसे थे' च असल्याने माताभक्तांचा हिरमोड झाला आहे.

घटस्थापनेपासून राज्यातील बहुतेक सर्व मंदिर खुली होत असताना, आदिशक्तींची देवालयेही उघडणार असल्याने भाविकांत समाधानाचे वातावरण आहे. ऐन नवरात्रात देवीची उपासना करणारांच्या दृष्टीने देवीचे दर्शन ही आनंदमय पर्वणीच ठरली आहे. त्यामुळे नवरात्रात आदीशक्तीचे गाभारे भक्तीभावाने फुलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर, नवरात्राबाबतचे गत दोन वर्षांपासूनचे नियम यंदाच्या वर्षीही कायम करण्यात आल्याने उत्सवाच्या उत्साहावर काहीसे विरजणच पडले आहे. नवरात्रोत्सव शांततेत व शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून साजरा करण्याचे आदेश देतानाच शासनाने नवरात्रातील महत्वाचा भाग मानल्या गेलेल्या रास दांडीया व गरबा वरील बंधने कायम ठेवल्याने नवरात्र जल्लोषात साजरा करण्याच्या भाविकभक्तांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.

Temple
Cruise Party प्रकरणात एकूण १६ जण अटकेत; कसून चौकशी सुरु

कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नसल्याने शासनाने नवरात्रावरील बंधने जेसे थे ठेवले असून, तसे आदेशपत्र सर्व पोलिस ठाण्यांना पारित केले आहेत. त्यानूसार, नवरात्रात रस्त्यावर रंगणारे रास दांडीया व गरबावरील बंदी कायम ठेवण्यात आली असून, उत्सवाबाबत काही मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंडप मर्यादीत असावेत, देवीची मूर्ती छोटी असावी, मूर्तीची प्रतिष्ठापणा रस्त्यावर उभारलेल्या मंडपात करण्याऐवजी एखाद्या मंदिरात किंवा घरात करावी, घरातील धातू किंवा संगमरवरच्या मूर्तीची पूजा करावी हे नियम कायम ठेवताना गर्दी टाळण्याचे कळकळीचे आवाहन शासकीय परिपत्रकात केले आहे. सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन करताना आरोग्य तपासणी किंवा रक्तदान शिबिर घ्यावे, मंडळाच्या परिसरात सामाजिक किंवा आरोग्य विषयक जनजागृती करणा-या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, असेही नमूद केले आहे. दर्शनाची ऑनलाईन सुविधा करावी, आरती, भजन, किर्तन हे गर्दी जमविणारे धार्मिक उपक्रम टाळावेत, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, देवीच्या आगमण व विसर्जन मिरवणूका काढू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

"मंदिरे उघडली जाणार असली; तरी तेथे दर्शनासाठी गर्दी होऊन कोरोना या भयंकर साथीचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्यादृष्टीने मंदिराच्या ट्रस्टींनी दर्शनबारीची व्यवस्था करावी. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल हे पाहावे. मास्क घातलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश द्यावा, सॅनिटायझर ठेवावे. शेजारील नगर जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याच्या व शेजारच्या पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील लोकांचा व्यापाराच्या निमीत्ताने पुणे जिल्ह्यातील शिरूरसह काही तालुक्यांतील राबता लक्षात घेता कठोर बंधने पाळावीच लागतील. शासकीय निर्बंधांबाबत शंका - कुशंका उपस्थित करण्याऐवजी आपण स्वतःहून अधिक कडक निर्बंध पाळावेत. शासकीय नियम मोडल्यास कायद्याचा कठोर बडगा उभारणे क्रमप्राप्त आहे."

- सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com