पोलिस बंदोबस्तात शिवभोजनाचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

मार्केट यार्डमधील शिव भोजनालयात सोमवारी तासाभरातच दीडशे थाळ्या संपल्या. पुन्हा नागरिकांची गर्दी झाल्यामुळे पोलिस संरक्षण मागण्याची वेळ अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली; तर पिंपरी-चिंचवड भागातील अन्य तीन केंद्रांवर योजनेला प्रतिसाद कमी मिळाला.

पुणे - मार्केट यार्डमधील शिव भोजनालयात सोमवारी तासाभरातच दीडशे थाळ्या संपल्या. पुन्हा नागरिकांची गर्दी झाल्यामुळे पोलिस संरक्षण मागण्याची वेळ अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली; तर पिंपरी-चिंचवड भागातील अन्य तीन केंद्रांवर योजनेला प्रतिसाद कमी मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ‘शिवभोजन थाळी योजना’ २६ जानेवारीपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यांत  पुणे महापालिका क्षेत्रात सात ठिकाणी एक हजार आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात चार ठिकाणी पाचशे थाळ्या अशा एकूण रोज दीड हजार थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. महापालिकेतील उपहारगृहात मुंजाजी भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे आदी या वेळी उपस्थित होते. 

शिवभोजन योजनेंतर्गत ११ भोजनालये सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी मंडई येथील भोजनालय खासगी कारणास्तव बंद असून, ते लवकरच सुरू होणार आहे, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी भोजनालये 
हडपसर गाडीतळ- शिवसमर्थ भोजनालय, कात्रज बसस्थानक- कात्रज केंद्र, स्वारगेट बसस्थानक- स्वारगेट बसस्थानक कॅंटीन, मार्केट यार्ड गुलटेकडी- हॉटेल समाधान गाळा नं ११, कौटुंबिक न्यायालय शिवाजीनगर- कौटुंबिक न्यायालय कॅंटीन, महापालिका भवन- हॉटेल निशिगंधा, पिंपरी चिंचवड महापालिका- कॅंटीन, महात्मा फुले मंडई- अनिल स्नॅक्‍स सेंटर, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी- कॅंटीन, वल्लभनगर बसस्थानक पिंपरी- कॅंटीन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण- कॅंटीन. राज्य सरकार प्रत्येक थाळीसाठी शहरी भागात ५० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये कंत्राटदारांना देणार आहे. 

थाळीतील मेन्यू
    दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात.

वेळ : दुपारी १२ ते २   
    जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाईल क्रमांक घेणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv bhojan yojana in Marketyard