पिंपरीत शिवोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आणि पोवाड्यांनी वातावरणात उत्साह भरला होता. दुतर्फा सजविलेल्या मिरवणूक मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात पायघड्यांवरून रथ निघाले होते.

पिंपरी - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष आणि पोवाड्यांनी वातावरणात उत्साह भरला होता. दुतर्फा सजविलेल्या मिरवणूक मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात पायघड्यांवरून रथ निघाले होते.

हातात भगवे झेंडे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लहान मुले, मावळ्यांच्या पेहराव्यातील तरुण, तसेच नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिलांचा लक्षणीय सहभाग होता. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. मंडळांनी चौकाचौकांत मंडप उभारले होते. तसेच, काही ठिकाणी चार दिवसांपासून व्याख्यानमालेसह विविध उपक्रम सुरू होते. शिवजन्मोत्सव समिती व मराठा सेवा संघाच्या वतीने भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसरात महिलांनी पाळणा गाऊन ‘जन्मसोहळा’ साजरा केला. शिवप्रेमींनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले. मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके सादर झाली. शिल्पाचे पूजन झाल्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. वारकऱ्यांनी  भजन सादर करून मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यानिमित्त ठिकठिकाणी अन्नदान, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. दापोडीत शिवप्रेमींनी मशाल प्रदक्षिणा घातली. या वेळी शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘रयतेचा राजा’ पुस्तिकेचे वाचन व वाटप करण्यात आले. सर्व शासकीय कार्यालयांतही शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनीही भगवा पेहराव परिधान केला होता. पीएमपी निगडी आगार येथे शिवशाहीर भास्कर जाधव यांचा पोवाडा सादर झाला.

सोशल मीडियावर लाइव्ह
सोशल मीडियावरही शुभेच्छा संदेशाचा वर्षाव सुरू होता. चौकाचौकांतील पोवाड्यांचे शिवप्रेमींनी सोशल मीडियावर लाइव्ह प्रक्षेपण केले. व्हॉट्‌सॲपवरही शिवरायांच्या पोवाड्यांची देवाणघेवाण सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti in pimpri