भ्रष्ट ‘सुभेदारी’ कारभाराचे ऑडिट करू

- मिलिंद वैद्य
सोमवार, 23 जानेवारी 2017

पिंपरी-चिंचवडचा ‘राजकारणी’ प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर विधायक राजकारण विसरला आहे. अजित पवारांनी निजामशाही, आदिलशाहीप्रमाणे येथे सुभेदाऱ्याच पोसल्या. आता वेळ आमची (शिवसेनेची) आहे. आम्ही सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीच्या सुभेदारांनी केलेल्या भ्रष्ट कारभाराचे ‘ऑडिट’ करू आणि पिंपरी-चिंचवडची स्वतंत्र ओळख निर्माण करू, अशा शब्दांत शिवसेना संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या शैलीदार शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या कारभाराचे चांगलेच धिंडवडे काढले. शिवकालीन अलंकारिक शैलीचा वापर करत व छत्रपती शिवरायांच्या व संभाजी राजांच्या ऐतिहासिक प्रसंगांचे दाखले देत त्यांनी राष्ट्रवादीच्या कारभाराचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘गेल्या दहा-पंधरा वर्षांत या शहराचा चेहरा बदलला, विकास केला, असे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऐकवले जात आहे; परंतु केवळ रस्ते केले, उड्डाण पूल उभारले म्हणजे विकास नव्हे; केवळ श्रीमंती असून चालत नाही. रस्ते, पूल, पुतळे उभारून विकास होत नाही. या तर रयतेच्या मूलभूत गरजा आहेत. त्या द्यायलाच हव्यात. पिंपरी-चिंचवड श्रीमंत खरच आहे; पण या श्रीमंतीला साजेशी इथली परंपरा, सांस्कृतिक ठेवा, इथल्या मातीतील कुस्ती, खेळ, इथले ग्रामीण जीवन, इथल्या नद्या, इथला धार्मिक-ऐतिहासिक ठेवा हे सगळे जपण्यासाठी एखादे सांस्कृतिक संकुल, पर्यटन केंद्र इत्यादी बाबींचा (लिबॅबिलीटी कोशंट) विकास झालेला नाही.

अजित पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना मी अजिबात कमी लेखत नाही. त्यांचा अनुभव, त्यांची क्षमता अफाट आहे, असा उल्लेख करून डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘पवारांच्या या गुणांचा लाभ इथल्या राजकारण्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. त्यांच्या दुर्लक्षामुळे आदिलशहा, निजामशहांसारखे सुभेदार पोसले गेले. त्यांच्याभोवती घुटमळत राहिले. मुठभरांसाठी हे सुभेदार आपल्याच तुमड्या भरत राहिले, जनता मात्र उपाशी राहिली.  या प्रसंगी शिवरायांनी जिंजी किल्ला जिंकल्यानंतर गडावर असलेल्या मावळ्यांना उद्देशून जे आज्ञापत्र लिहिले होते, त्याची आठवण होते. ‘रात्री पहारा देताना काळजी घ्या. दिव्यांकडे लक्ष्य द्या, पेटत्या वातीने गंजी पेटल्या तर गडावरील लोकांनी, मुक्‍या जनावरांनी जायचे कुठे?’ राजा असूनही भविष्याचा व धोक्‍याचा दूरदृष्टीने चौफेर विचार करण्याची महाराजांची क्षमता होती. येथे ती न दाखविल्यानेच सत्तेवरून पायउतार होण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा ऊहापोह व्हायला पाहिजे. आता सत्तेवर येण्याची वेळ आमची आहे. सर्वकाही मुठभरांसाठी नव्हे, तर थोडेसे पण जनतेसाठी चांगले काम करणार आहोत.’’

भाजपमध्ये सुरू असलेल्या ‘इन्कमिंग’विषयी बोलताना त्यांनी ‘चेहरे तेच फक्त, चिन्ह बदलले आहे,’ असा खोचक उल्लेख केला. डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘वर्षानुवर्षे मेहनत करून कमविलेले शरीरच कामाला येते. ऐनवेळी शरीरावर आलेली सूज उपयोगाची नसते. शिवसेना म्हणजे कमविलेले शरीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भाजपचे लोक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. आता ते गुंड असल्याचे राष्ट्रवादीचे लोक म्हणत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या कलगीतुरा रंगला आहे. एकमेकांवर आरोपांची राळ उडविली जात आहे; परंतु शहराच्या प्रश्‍नांवर कोणी बोलताना दिसत नाहीत.’’

शाश्‍वत विकास करू
रेडझोन, शास्तीकर, बंदिस्त जलवाहिनी हे प्रश्‍न आज निर्माण झालेले नाहीत. आधीच्या सरकारने या प्रश्‍नांचे राजकारण केले आणि आताही गेल्या अडीच वर्षांत पिंपरी-चिंचवडकरांना त्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. बंदिस्त जलवाहिनीबाबत मावळचा विरोध लक्षात घेता कुणाच्या मुखात स्वच्छ जल जाण्यासाठी इतरांच्या मुखात गटारगंगा जाऊ नये असे वाटते. आमची सत्ता येथे आल्यास मूठभर सुभेदारांसाठी सर्वकाही करण्याऐवजी थोडा पण शाश्‍वत विकास जनतेसाठी करू, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी जाता-जाता स्पष्ट केले.

युतीचा चेंडू भाजपच्या कोर्टात
पिंपरी-चिंचवड शहरात निवडणुकीसाठी युती व्हावी, असे आमचे (शिवसेना) मत आहे. युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. गेल्या तीन-चार बैठकांतून समाधानकारक तोडगा निघाला नसला तरी त्या दिशेने दोन्ही पक्षांची वाटचाल सुरू आहे. आम्ही भाजपपुढे प्रस्ताव दिलेला आहे. आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. लवकरच समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्‍वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

Web Title: Shiv Sena chief. Dr. Amol Kolhe interview