पुण्यात सेनेला धक्का; मनसेचा पहिला उमेदवार विजयी

सलील उरुणकर - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सेनेचे उमेदवार पिछाडीवर गेल्यावर मतमोजणी केंद्राबाहेर वातावरण बदलले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निकालावर विश्वास बसत नव्हता

पुणे - शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोंढवा-मिठानगर या प्रभाग क्रमांक 27 मध्ये आज (गुरुवार) धक्कादायक निकाल लागला. माजी आमदार महादेव बाबर यांच्या पत्नी स्मिता बाबर यांच्यासह सेनेचे तिन्ही उमेदवारांचा पराभव झाला. या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभागातील चौथ्या जागेवर मनसेचे साईनाथ बाबर यांनी विजय मिळवला आणि पक्षाचे शहरातील खातेही उघडले. 

शिवसेनेच्या स्मिता बाबर, सीमा चौधरी आणि अमर पवळे हे तिघेही उमेदवार पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये आघाडीवर होते. त्यामुळे ते विजयी होतील असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत होता. मात्र तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अचानक आघाडी घेत सेनेला आश्चर्याचा धक्का दिला.

मनसेच्या साईनाथ बाबर यांच्या विरोधात सेनेने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे त्यांची लढत थेट राष्ट्रवादीच्या रईस सुंडके यांच्या विरोधात होती. साईनाथ यांना एकूण 9589 मते मिळाली तर रईस सुंडके यांना 8639 मते मिळाली. साईनाथ हे 950 मतांच्या फरकाने जिंकले. 

सेनेच्या स्मिता बाबर यांना 7187 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या परवीन शेख यांना 8362 मते मिळाली. परवीन या 1175 मतांनी निवडून आल्या. सेनेचे अमर पवळे यांना 5374 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या ऍड. अब्दुल गफूर पठाण यांना 9768 मते मिळाली. पठाण हे 4394 मतांच्या फरकाने विजयी झाले. 

माजी नगरसेवक भरत चौधरी यांच्या पत्नी सीमा यांना 6099 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या हमीदा सुंडके यांना 8066 मते मिळाली. हमीदा यांना 1967 चे मताधिक्य मिळाले. 

सेनेचे उमेदवार पिछाडीवर गेल्यावर मतमोजणी केंद्राबाहेर वातावरण बदलले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना निकालावर विश्वास बसत नव्हता. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती राणी ताटे यांनी दुपारी सव्वा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला

Web Title: Shiv Sena faces setback in Pune