
Pune : शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची मॉलमध्ये १०० फुटी कागदी प्रतिमा
हडपसर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अमनोरा मॉलमध्ये महाराजांची तब्बल १०० फूट कागदी प्रतिमा साकारण्यात आली आहे. उद्देश पघळ आणि ऋतुजा घुले या कलाकारांनी तब्बल ५० हजार घोटीव कागदी तुकड्यांचा वापर करून बारा तासांत हा कलाविष्कार केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाला यावर्षी ३४९ वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने आमदार चेतन तुपे आणि सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे. शहरात अशाप्रकारची शिवरायांची प्रतिमा पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. दोन दिवस ही कलाकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश तुपे यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
"अल्पावधीत हा कलाविष्कार साकारण्याचे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. ५० हजार घोटीव कागदांच्या चार बाय चार इंची तुकड्यांतून बारा तासांच्या अल्प काळात राजांची ही अनोखी प्रतिमा पूर्ण झाल्याने खूपच आनंद होत आहे,' अशी भावना कलाकार उद्देश व ऋतुजा यांनी यावेळी व्यक्त केली.