मराठा महासंघाचा राज्यव्यापी ‘जागर’ सुरू

मराठा महासंघाचा राज्यव्यापी ‘जागर’ सुरू
Published on

आग्रा, ता. १७ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेला ३६० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यव्यापी ‘शिवछत्रपती जागर’ अभियानाची सुरुवात आग्रा येथे सोमवारी (ता. १७) करण्यात आली. आग्रा किल्ल्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या अभियानाची सुरुवात झाली. या वेळी फुलांची उधळण करीत शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
आग्रा येथून सुरू झालेले हे जागर अभियान महाराष्ट्रातील गावागावात पोहोचविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शिवचिंतन, कीर्तन, व्याख्याने तसेच ‘मराठा तुकोबा मेळावे’ आयोजित करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच संत तुकाराम महाराजांच्या समता, एकता आणि बंधुत्वाच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक ऐक्य बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. आग्र्याचे खासदार राजकुमार चाहर, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे-पाटील, उपाध्यक्ष संतोष नानावटे यांच्यासह महासंघाचे प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेले शिवप्रेमी या कार्यक्रमास उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज वारकरी संप्रदायाच्या विचारांशी जोडलेले होते. तलवारीसोबत संतांच्या विचारांची कास धरून त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. आज समाजातील जातिभेदाची दरी दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या विचारांचा प्रसार करणे, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन वाटचाल करणे, हाच ‘मराठा तुकोबा मेळाव्या’चा मुख्य उद्देश आहे, असे संभाजीराजे दहातोंडे-पाटील यांनी सांगितले.

नव्या पिढीपर्यंत वारसा पोचविणार
शिवकालीन परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या विचारांचा समन्वय साधून महाराष्ट्राचा समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे तसेच शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रभावना बळकट करणे, हे या जागर अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महासंघाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com