गनीमास खिंड चढो दिल्ही नाही

गनीमास खिंड चढो दिल्ही नाही
Published on

लोगो ः स्वराज्याचा रणसंग्राम
अनिकेत यादव

गनीमास खिंड चढो दिल्ही नाही

१३ जुलै १६६०ची रात्र! अवघ्या ६०० निवडक मावळ्यांनिशी राजे पन्हाळ्याहून वेगाने निघाले. २ पालख्या सोबत होत्या, एकात राजे स्वतः तर एकात राजांप्रमाणे हुबेहूब पोशाख केलेले शिवा काशीद बसले होते. राजांनी मांडलेला हा डाव शत्रूच्याच काय तर सोबतच्या मावळ्यांनाही चक्रावून सोडणारा होता. शत्रूची दिशाभूल करून राजगडाकडे सुरक्षित पोहोचण्यासाठी त्यांनी हा डाव आखला होता.

राजांचे डावपेच ः पन्हाळ्याहून बाहेर पडताच मोजक्या धारकऱ्यांना घेऊन शिवा काशीद यांनी मलकापुराच्या दिशेला जायचे आणि काही संकट न आल्यास गजापूरला मुख्य तुकडीला येऊन मिळायचे होते. राजांच्या तुकडीने म्हसाई पठार उतरून डोंगरधारेने व घनदाट जंगलवाटेने गजापूरच्या मार्गे खेळण्यावर (विशाळगड) पोहोचायचे. त्यानंतर सर्वांना एकत्र करून त्वरेने राजगडाकडे निघायचे. परंतु काही लोकांचा जमाव म्हसाई पठारावरून जात असल्याचे आदिलशाही हेरांनी पाहिले आणि त्यांनी तात्काळ सिद्दी जौहरला (सलाबतखान) याची माहिती दिली. जौहरने त्वरेने आपला जावई सिद्दी मसूद यासोबत १००० पायदळ आणि २००० घोडेस्वार देऊन त्यांच्या पाठलागावर पाठवले. सिद्दी मसूदने ऑक्टोबर १६५३मध्ये कावेरीपट्टणच्या लढाईत विजयनगरचा शेवटचा सम्राट श्रीरंग रायल याचा सेनापती दासराज याला ठार मारून मोठे शौर्य गाजविले होते. तेव्हा आदिलशाहाने त्याला ‘मस्ऊदखान’ असा किताब दिला होता. अशा आपल्या पराक्रमी जावयाला सिद्दी जौहरने मराठ्यांचा सोक्षमोक्ष लावण्याची कामगिरी सोपविली.

शिवा काशीदांचे बलिदान
शत्रूला चकविण्यासाठी राजांनी शिवा काशीदांना पालखीत बसवून नेहमीच्या मार्गाने मलकापुराच्या दिशेला पाठविले होते. सिद्दी मसूद म्हसाईच्या पठारावरून मळलेल्या वाटेने पुढे आल्यावर त्याला ही तुकडी दिसली. मसूदची सैन्यसंख्या जास्त असल्याने फारसा प्रतिकार न करता या तुकडीला बंदी बनवून त्यांना सिद्दी जौहरच्या छावणीकडे आणण्यात आले. शिवाजीराजांना बंदी बनवून आणल्याची वार्ता सर्व आदिलशाही सैन्यात वाऱ्यासारखी पसरली आणि सैन्यात शैथिल्य आले. मात्र जौहरला राजांची ही खेळी समजली, तेव्हा आदिलशाही सैन्यात पुन्हा एकदा नैराश्य पसरले. तोपर्यंत राजांना खेळण्याकडे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता.

गजापूरच्या खिंडीतील रणकंदन ः सिद्दी जौहर झालेल्या फजितीमुळे अजूनच चवताळून उठला आणि त्याने मसूदला पुन्हा एकदा खेळण्याकडे गेलेल्या मराठ्यांच्या मागावर धाडले. आदिलशाही घोडेस्वार आपल्या पाठीमागे येत आहेत, याची कुणकुण गजापूरजवळ आपल्या पायदळासह पोहोचलेल्या राजांना लागली. तेव्हा त्यांनी सोबतच्या बांदलांच्या तुकडीला गजापूरच्या खिंडीत तैनात केले आणि ते विशाळगडाकडे गेले. गजापूरच्या खिंडीत मग जे रणकंदन माजले, ते इतिहासात अजरामर झाले. मसूद व मराठ्यांमध्ये भयंकर हातघाईची लढाई उडाली, जो तो जीवाच्या आकांताने लढत होता. बांदलांनी पराक्रमाची शर्थ केली. अखेर बाजी प्रभू देशपांडे व काही सैनिक धारातीर्थी पडले. तरीही शिवसैन्याने प्राणांची बाजी लावत शत्रूला खिंड चढू दिली नाही. अखेर मसूदने माघार घेतली व तो जौहरच्या छावणीकडे परतला. (राजे विशाळगडावर गेल्याचा बनाव असावा आणि ते अद्याप पन्हाळ्यावरच असावेत या शंकेने जौहरने तिकडे मोठे सैन्य न पाठवता पन्हाळ्याचा वेढा अधिकच घट्ट केला.)

खेळण्याचा वेढा फोडला
इकडे खेळणा (विशाळगड) मराठ्यांच्या ताब्यात असला, तरीही पालीचे (पल्लीवन) जसवंतराव दळवी, शृंगारपूरचे (प्रभावळी) सूर्यराव सुर्वे व अन्य काही सरदारांनी त्याभोवती वेढा दिला होता. हे सैन्य फारसे नव्हते आणि पन्हाळ्याहून राजे निसटून इकडे येतील अशी सुतराम शक्यता नसलेल्या या गाफील सैन्याला राजांनी युद्धाद्वारे तात्काळ पळवून लावले. आणि १४ जुलैच्या सुमारास ते खेळण्यात सुखरूपपणे पोहोचले. तोपर्यंत या सैन्याने अखंड धावून २१ तासांत (७ प्रहर) ६४ कि.मी. (५ योजन/४० मैल) चे अंतर कापले होते. (शि.भा.२७।१३).

राजे राजगडावर
त्यानंतर लवकरच, ५-६ दिवसांचा प्रवास करून शिवाजीराजे राजगडावर पोहोचले. बांदलांच्या तुकडीने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राजांनी बांदलांचा व इतर सर्व मावळ्यांचा यथोचित सन्मान केला. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप सुटून स्वराज्यात परतले, या त्यांच्या अकल्पित धाडसी कृत्यामुळे स्वराज्यावर कोसळू पाहणारे कृष्णमेघाचे काहूर कुठच्या कुठे वितळून गेले. राजगडावर पसरलेली काळजीची छाया पार ओसरली आणि ती छाया अली आदिलशाहास सतावू लागली.

अली आदिलशाहाची स्वारी
सिद्दी जौहरला मोठी लाच देऊन राजे पन्हाळ्याहून बाहेर पडल्याचा संशय अली आदिलशाहाला आला. त्यामुळे तो अजूनच काळजीने त्रस्त झाला. त्यामुळे १७ ऑगस्ट १६६० रोजी स्वतः अली आदिलशाह आपल्या सैन्यासह विजापूरहून पन्हाळ्याकडे निघाला. मिरज (मुर्तजाबाद) येथे आलेला असताना, मराठ्यांनी जौहरकडे पन्हाळ्याचा ताबा दिल्याचा संदेश त्याला मिळाला.

राजांचे शांततेचे प्रयत्न
महाराज २१-२५ जुलैच्या दरम्यान राजगडावर पोहोचले. त्यानंतर काही काळातच (१५ ऑगस्ट) चाकणचा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला. आदिलशाह व मुघल या दोन आघाड्यांवर एकाच वेळी युद्ध सुरू ठेवणे कठीण असल्यामुळे, राजांनी पन्हाळ्याचे किल्लेदार त्रिंबक भास्कर यांना जौहरकडे किल्ला सुपूर्द करण्याचा संदेश पाठवला. त्यानुसार त्रिंबक भास्कराने सिद्दी जौहरशी (सलाबतखान) जवळीक वाढविली आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी पन्हाळा त्याच्या स्वाधीन केला. (जेधे शकावली) याशिवाय मुघलांशी सलोख्याची बोलणी करण्यासाठी नोव्हेंबर १६६०च्या सुमारास राजांनी सोनाजी पंडित यांना शायिस्ताखानाकडे पाठविले. मात्र ही भेट अयशस्वी होऊन सोनाजीपंत राजगडावर माघारी परतले. (जेधे शकावली)

जौहरचे बंड
पन्हाळा ताब्यात आल्यानंतर अली आदिलशाहाने सिद्दी जौहरला कानडा प्रांतातील वेंटप नायक याचे पारिपत्य करण्याची मोहीम सोपविली. मात्र अली आदिलशाहाच्या मनात जौहरविषयी कमालीचा संशय उत्पन्न झाल्याने जौहर मनातून नाराज झाला होता. त्यातच मुघलांचा दख्खनेतील सुभेदार शायिस्ताखान याने आदिलशाही सरदारांना फितविण्याचे काम सुरू केले होते. त्यामध्ये जौहर त्याच्या जाळ्यात अडकला. कृष्णेच्या काठावर रकसगी तंगडगी या दरम्यान जौहरची छावणी पडलेली असताना, त्याने मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारल्याचे सांगून आदिलशाहीविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे चिडून जाऊन अली आदिलशाहा जौहरच्या पारिपत्यासाठी २६ जानेवारी १६६१ रोजी विजापूरहून निघाला. दोघांची गाठ मुदगल येथे पडली आणि उभयतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जौहर कर्नूलकडे पळून गेला आणि काही कालावधीतच मेला. (तारीख-इ अली) काहींच्या मते, अली आदिलशाहाने (१७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर १६६१ या दरम्यान) जौहरला विष देऊन मारले. (शि.भा.२८।१-२४).
एक मात्र चांगले झाले, सिद्दी जौहरच्या या बंडामुळे मिरजेपर्यंत आलेल्या अली आदिलशाहाने स्वराज्याकडे पाऊल टाकले नाही, अन्यथा मुघल व आदिलशाही सैन्याच्या कात्रीत स्वराज्य अडकले असते आणि मोठा कठीण प्रसंग उद्‍भवला असता. मुघली सैन्य विजापूरच्या वेशीवर आल्याने जौहरप्रमाणे इतरही आदिलशाही सरदारांमध्ये धांदली उडू नये यासाठी अली आदिलशाहाला शिवाजीराजांचा समाचार घेण्याची भाषा सोडून द्यावी लागली. यामुळे आदिलशाहीच्या कटकटीतून राजे काहीसे मुक्त झाले. आणि त्यांनी आता शायिस्ताखानाच्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा निर्धार केला.

मुघलांनी परांडा मिळविणे व त्याचे परिणाम
आदिलशाहाने दक्षिणेकडील महत्त्वाचा असा पन्हाळा मिळविला, मात्र उत्तर सीमेवरचा परांडा मात्र गमावला. परांड्याचा किल्लेदार गालिब याने मुघलांची नोकरी स्वीकारली व २१ नोव्हेंबर १६६० रोजी परांडा (प्रचंडपूर) मुघलांच्या स्वाधीन केला. (जेधे शकावली) (शि.भा.२८।५४).
या प्रकाराने अली आदिलशाहाचे डोळे उघडले. आणि ज्या शिवाजीराजांविरुद्ध लढण्यासाठी त्याने औरंगजेबाला विनंती करून मुघली सैन्य दक्षिणेत मागविले. त्या शिवाजीराजांचाच मुघली आक्रमणापुढे आता त्याला आधार वाटू लागला. मुघल शिवाजीराजांशी लढण्यात व्यग्र असले तर आणि तरच मुघलांचे आदिलशाहीकडे लक्ष पडणार नाही, या वास्तवाचे भान अली आदिलशाहास आले. त्यामुळे या घटनेनंतर आदिलशाहाने शिवाजीराजांविरुद्धचे आक्रमक धोरण सौम्य केले.
डच आपल्या २२ फेब्रुवारी १६६४च्या पत्रात म्हणतात, ‘अनेक लोक त्याला (शिवाजीराजांना) विजापूरच्या साम्राज्याचे एकमेव रक्षक मानतात; कारण (शिवाजीराजे) नसते, तर हे साम्राज्य (आदिलशाही) खूप पूर्वीच मुघलांनी जिंकून घेतले असते.’ म्हणजेच ज्या राज्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला, त्याच साम्राज्याचे शिवाजीराजे आता रक्षक बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com