पिंपरी-चिंचवड शहराला भगवी झालर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 March 2020

वंशजांची उपस्थिती 
श्री काळभैरव उत्सव समिती व समस्त चिंचवडगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी सकाळी सात वाजता शेकडो शिवप्रेमींकडून चापेकर चौकातून पर्यावरण बचाव सायकल रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालुसरे, जेधे, इंदलकर, कोंडे, करंजावणे या मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री काळभैरवनाथ मंदिर, चिंचवडगावात शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवानिमित्त पालखी काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, हलगी, संबळ, वारकरी पथक, बैलगाडी, घोडेस्वार या उपस्थितीत शिवरायांची चौदा फुटी तर संभाजी महाराजांची सात फुटी मूर्तींची चापेकर चौकातून सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. केरळमधील कलावंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन घडविणार आहेत.

पिंपरी - गेल्या काही वर्षांपासून शहरात सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याचे स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहे. तिथीनुसार २२ ठिकाणी ‘एक गाव एक शिवजयंती’ साजरी करण्यात येत आहे. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. ११) शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. 

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच शिवप्रेमींमध्ये उत्साह असून, या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. पिंपरीगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, टाळगाव चिखली, देहूगाव, कासारवाडी, खराळवाडी, थेरगाव, रावेत, किवळे, वाल्हेकरवाडी, आळंदी देवाची, निगडी साईनाथ, आकुर्डी, शाहूनगर अशा ठिकाणी ‘एक गाव एक शिवजयंती’ साजरी करण्यात येत असल्याने शहरातील चौकांमध्ये भगवे ध्वज, भगव्या पताका, मोठ्या आकारातील होर्डिंग्ज यासह विद्युत रोषणाई करण्यात आल्याने चैतन्य निर्माण झाले आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांसोबतच पारंपरिक वाद्याच्या तालात निघणाऱ्या या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. पारंपरिक शस्त्रपूजन, मर्दानी खेळ, तलवारबाजी पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे.

Good News : कोरोनाचे विषाणू एका मिनिटात नष्ट होणार, रसायनचा शोध

पिंपरीगावात अखिल पिंपरी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला आकर्षक देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

शाहूनगरला ४५ मंडळांचा सहभाग 
शिवजयंती उत्सव समिती अखिल शिवतेजनगर, संभाजीनगर, शाहूनगर, पूर्णानगर अशा परिसरातील ४५ मंडळे व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता श्री शनी मंदिर मैदान पूर्णानगरमार्गे ऐतिहासिक सजविलेल्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात ढोल पथक, अश्‍वारूढ मावळे, वारकरी भजनी मंडळासह शिवरायांच्या वेशभूषेत १०१ बालशिवराय, मावळ्यांच्या वेशभूषेत १०१ तरुण, पारंपरिक वेशभूषेत १०१ तरुणींचा तुर्रेदार फेटे घालून सहभाग असणार आहे.

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभाग सज्ज - श्रावण हर्डीकर

चिखलीत पंचवीस फुटी मंदिर
गेल्या सहा वर्षांपासून अखिल टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या वतीने सकाळी नऊ वाजता शिवनेरी येथून आलेल्या शिवज्योतीचे पूजन झाल्यानंतर सकाळी दहा वाजता दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. दादामहाराज नाटेकर गुरुकुलचे विद्यार्थी ‘भूदेव संतासी सदा नमावे’ हा संत चरित्रपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी पाच वाजता पवारवस्ती ते कुदळवाडी मार्गे ते चिखलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे शिव मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात रायगडावरील २५ फुटी जगदीश्‍वराचे मंदिर प्रवेशद्वार प्रतिकृती, विविध ढोल पथक, मल्लखांब पथक, वारकरी पथक, राजस्थानी गेर नृत्य, ध्वजपथके तसेच अठरा पगड जातीतील विविध संतांचा रथ या पारंपरिक मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti celebration in pimpri chinchwad city